कर्मयोग आचरणाऱ्याचा आत्मा मुक्त होतो

कर्मयोग आचरणाऱ्याचा आत्मा मुक्त होतो

अध्याय पहिला
बाप्पा म्हणाले, आत्मनात्मविवेकामुळे आत्म्याच्या उद्धाराशी संबंधित काय आहे आणि काय नाही हे समजते आणि त्यानुसार कृती घडते, त्यामुळे साधकाचा आत्मज्ञानाशी योग जुळून येतो. म्हणून त्याला ज्ञानयोग म्हणतात. निरपेक्षतेने कर्म केल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या पाप पुण्यास तो जबाबदार नसल्याने त्याचे नवीन प्रारब्ध तयार होत नाही. स्वधर्माची जाणीव व आत्मनात्मविवेक समजणे हा योग होय. हा समजला की, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन व्हायला फारसा वेळ लागत नाही. म्हणून माणसाने जीवनामध्ये आत्मनात्मबुद्धी प्राप्त करून घेणे हे आपले कर्तव्य समजावे आणि ती प्राप्त होण्यासाठी निरपेक्षतेने वाट्याला आलेले कर्म करत रहावे. ईश्वरानेसुद्धा जेव्हा जेव्हा प्रत्यक्ष अवतार घेतला त्यावेळी त्यानेही अशाच पद्धतीने कर्मे केली. वास्तविक पाहता त्याला विशेष काही करण्याची किंवा काही मिळवण्याची बिलकुल गरज नव्हती. तरीही ह्यालोकी जन्म घेतल्यावर येथील लोकांना आदर्श जीवनशैली कशी असावी हे दाखवून देण्यासाठी त्याने कर्मयोगाचे पालन केले. श्रीराम किंवा श्रीकृष्णाचे चरित्र अभ्यासले की, त्यांनी अवतारकाळात आचरलेला कर्मयोग सहजी लक्षात येतो. अर्थात इतर अवतारातही त्यांनी कर्मयोग आचरला आहेच पण वरील दोन अवतारकाळात ते दीर्घकाळ पृथ्वीवर वावरत असल्याने त्यांनी केलेले कर्मयोगाचे पालन ठळकपणे नजरेत भरते.
सध्या आपण अभ्यासत असलेल्या धर्माधर्मौ
जहातीह तया युक्त उभावपि ।
अतो योगाय युञ्जीत योगो वैधेषु कौशलम् ।।49।।
ह्या श्लोकात बाप्पा असं सांगतायत की, आत्मनात्मविवेक बुद्धीने युक्त असलेला मनुष्य इहलोकी धर्म व अधर्म या दोहोंच्या फलांचा त्याग करतो. तू ही हा योग आत्मसात करून घे. असे केलेस की, निरपेक्षतेने विधिपूर्वक कर्म करण्यात तू कुशल होशील. हे कौशल्य आत्म्याचे परमात्म्याशी मिलन साधून देते.
ह्या श्लोकात एक महत्त्वाचा मुद्दा बाप्पा स्पष्ट करतायत तो असा की, प्रत्येकाला नियतीनं कामं ठरवून दिलेली आहेत. त्यातील काही दिसायला चांगली आहेत, काही वाईट आहेत. काही पवित्र आहेत, काही अपवित्र आहेत पण ज्याला जे काम वाट्याला आलंय ते त्यानं कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता करून मला अर्पण केलं की, चांगलं, वाईट, पवित्र, अपवित्र अशा कोणत्याही कर्मांपासून जे पापपुण्य तयार होतं ते त्याच्या खात्यात बिलकुल जमा होत नाही. पूर्वकर्मानुसार माणसाला सुखदु:खाचे भोग भोगावे लागतात. जे भोग भोगण्याची वेळ आलेली असते ते तो ह्या जन्मी भोगून संपवतो. माणसाच्या प्रारब्धानुसार त्याच्या वाट्याला कर्मे येत असतात. चालू जन्मात जर त्यानं स्वधर्म पालन केलं तर त्याला आत्मज्ञान होतं. त्यामुळे जे भोग भोगण्याची अजून वेळ आलेली नसते ते भोग त्या आत्मज्ञानाच्या तेजाच्या धगीत जळून भस्म होतात. तसेच पूर्वीचे भोग भोगत असताना तो कर्मयोगाचे आचरण करत असल्याने त्याचं नवीन प्रारब्ध तयार होत नाही. परिणामी हा जन्म संपला की, देहाच्या कैदेत पडलेल्या त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळते.
एखादा मृत्यू पावला की, आपण ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, त्याच्या आत्म्याला चिरशांती मिळो पण प्रत्यक्षात आत्म्याला चिरशांती देणं ईश्वराच्या हातात नसून माणसाच्याच हातात असतं. ईश्वर माणसाच्या कर्मानुसार जे पापपुण्य तयार होईल ते स्वीकारून त्याला त्यापासून मोकळे करायची जबाबदारी घेतो पण माणूस ही बाब मान्यच करत नसल्याने तो ईश्वरावर ही जबाबदारी सोपवण्यास क्वचितच तयार होतो. हे सर्व लक्षात घेऊन बाप्पा सांगतायत की, जो अशी तयारी दाखवेल त्याला विवेकबुद्धी प्राप्त होते. अशी बुद्धी प्राप्त करून घेणे व त्यानुसार कौशल्याने कर्मे करणे हाच खरा कर्मयोग आहे.
क्रमश: