शिवभारत अध्याय एकोणतिसावा
कवींद्र म्हणाला :-
नंतर सूर्य मध्याह्नीं येऊन शिवाजीच्या तेजाबरोबरच ताप देऊं लागला असतां, पूर्वीं कधीं न पाहिलेल्या, शत्रूच्या ( मराठ्यांच्या ) रक्षणाखालीं असणार्या, वारा मुळींच नसणार्या, अशा महारण्यामध्यें सगळें सैन्य दुःखी होऊन धीर सोडतांना पाहून मदोन्मत्त रायबागीण कारतलबास म्हणाली. ॥१॥२॥३॥
रायबागीण म्हणाली :-
शिवाजीरूपी सिंहाच्या आश्रयाखालीं असणार्या वनांत सैन्यासह प्रवेश केलास हें तूं वाईट काम केलेंस ! ॥४॥
दिल्लीपतीचें सैन्य येथें घेऊन येऊन तें त्वां गर्विष्ठानें सिंहाच्या जबड्यांत आणून सोडलें ही दुःखाची गोष्ट होय ! ॥५॥
आजपर्यंत दिल्लीपतीनें जेवढें यश मिळविलें तें त्याचें सारें यश तूं ह्या अरण्यांत बुडविलेंस ! ॥६॥
पहा ! मागें व पुढें, उजवीकडे व डावीकडे उभे असलेले शत्रु आनंदानें लढूं इच्छीत आहेत. ॥७॥
हे पटाईत तिरंदाज असलेले तुझे सर्व सैनिक येथें चित्रांतील मनुष्यांप्रमाणें अगदीं स्तब्ध आहेत ! ॥८॥
खेदाची गोष्ट कीं, दिल्लीपतीच्या त्या मूर्ख सेनापति शाएस्तेखानानें शत्रूच्या प्रतापरूपी अग्नीमध्यें तुला सैन्यासह टाकलें ! ॥९॥
शत्रु तुला ताबडतोब जिवंत पकडून नेऊं इच्छीत आहे. तूं मात्र अरण्यांत कोंडला गेला असून आंधळ्याप्रमाणें युद्ध करूं इच्छीत आहेस ! ॥१०॥
फलनिष्पति होत असेल, तरच पुरुषाच्या उद्योगाचा ह्या जगांत उपयोग; नाहींतर तेंच साहसाचें कृत्य खरोखर उपहासास कारणीभूत होतें ! ॥११॥
म्हणून तूं आज लगेच त्या राजास ( शिवाजीस ) शरण जाऊन आपणास सैन्यासह मृत्युपाशांतून सोडीव. ॥१२॥
ह्याप्रमाणें रायबागिणीनें त्या महाशूर व साहसी यवनास तेथें जागें केल्यावर तो युद्धापासून परावृत्त झाला. ॥१३॥
नंतर त्यानें नम्रभाव स्वीकारून दुसर्याचें मन ओळखणारा दूत शिवाजीकडे पाठविला. ॥१४॥
मग भालदारांनीं तेथें त्याची वर्दी दिल्यावर त्यानें मस्तक लववून आजानुबाहु शिवाजी राजाचें दुरून दर्शन घेतलें. तो अतिसुंदर व उंच मानेच्या, रुंद छातीच्या, शिकविलेल्या, सुलक्षणी, धिप्पाड शरीराच्या महाबलवान्, दोन्ही बाचूंस बाणांचे दोन भाते पंखांप्रमाणें असलेल्या, रत्नजडित अलंकार घातलेया अशा घोड्यावर – गरूडावर विष्णु बातो तसा – आरूढ होऊन अंगांत कवच घातलेल्या व हातांत धनुष्यबाण व तरवार असणार्या घोडदळाच्या समुदायामध्यें होता; त्याच्या अंगांत अभेद्य कवच होतें; त्याच्या मस्तकावर उत्कृष्ट शिरस्त्राण शोभत होतें; वैकक्ष हारासारखा व प्रचंड ढालीनें शोभणारा दुपेटा परिधान केला होता; सोनेरी कमरपट्यापासून लटकणार्या तरवारीच्यायोगें तो शोभत होता; त्याच्या तेजस्वी उजव्या हातांत उंच भाला होता; तो अत्यंत सौम्य असूनहि आपल्या तेजानें अत्यंत उग्र दिसत होता; पुढें जाऊन लोकांस दूर सारणार्या भालदारांनीं योग्य स्थानीं उभे केलें अनेक सैनिक त्याचा उत्तम सन्मान करीत होते; तो शंकराहूनहि उग्र, अग्नीपेक्षां अत्यंत असह्य नैरृतापेक्षांहि अतिशय निर्दय, वायूहूनहि बलवान, कुबेराहूनहि धनाढ्य, इंद्राहूनहि समर्थ, यमाहूनहि क्रूर, वरुणापेक्षांहि नीतिज्ञ, चंद्रापेक्षांहि आल्हाददायक, आणि मदनापेक्षांहि अजिंक्य होता. ॥१५॥१६॥१७॥१८॥१९॥२०॥२१॥२२॥२३॥२४॥२५॥
मस्तक नमवून आलेल्या त्या मोंगल दूताकडे ( वकिलाकडे ) राजानेंसुद्धां कमलासारख्या सुंदर नेत्रांनीं पाहिलें. ॥२६॥
नंतर शिवाजीनें किंचित् भिवया चढवून त्यास आज्ञा केल्यावर, त्यानें ज्याचा ( कारतलबाचा ) संदेश आणला होता, त्याचें म्हणणें स्वतः सांगितलें. ॥२७॥
दूत म्हणाला :-
ज्या कारतलब नांवाच्या सरदारास लोक जणूं काय दुसरा अजिंक्य रावणच समजतात, तो आपणास अशी विनंती करतो :- ॥२८॥
शाएस्तेखानाच्या आज्ञेमुळें व वेळ आली म्हणून हा आपला देश पाहण्य़ाची आम्हास पाळी आली ! ॥२९॥
नागानें दीर्घ काळ स्वतः धारण केलेल्या मन्याप्रमाणें हा आपल्या संरक्षणाखालीं असलेला देश दुसर्याच्या ताब्यांत जाणार नाहीं. ॥३०॥
काय सांगावें ! दोन तीन दिवस मला येथें पाणीसुद्धां प्यावयास मिळालें नाहीं; म्हणून अभयदान देऊन मला जीवदान दे. ॥३१॥
सह्याद्रीच्या जणूं काय पाताळासारख्या खोल तळास येऊन आम्हीं मनांत दीर्घ काळ स्तिमित झालों आहोंत व पराक्रमसुद्धां विसरलों आहों ! ॥३२॥
हें आपलें अरण्य तुंगारण्यापेक्षां निबिड आहे. महासागरासारख्या ह्या अरण्यांत आपण आमचें रक्षण करावें. ॥३३॥
आपला पिता महामति, महाराज शहाजीराजा याचा मी यवन असतांहि मजवर अमर्याद लोभ होता. ॥३४॥
तें सर्व विसरून जाऊन दुसर्याच्या सेवकत्वामुळें मी अग्नितुल्य असे जे आपण त्यांची जाणून बुजून अवज्ञा केली. ॥३५॥
म्हणून, हे महाबाहो, मी आपलें सर्वस्व आपणास अर्पण करून आपल्या अपराधाचें क्षालन करूं इच्छितों आणि जिगंतपणें जाऊं इच्छितों. ॥३६॥
म्हणून, हे राजा, ह्या प्रदेशांतून बाहेर, पडण्याची आपण मला परवानगी द्यावी. ह्या जगांत शरणगताचें रक्षण करणारे आपणासारखेआपणच आहां. ॥३७॥
ह्याप्रमाणें यथोचित्त बोलून तो दूत ( वकील ) थांबला असतां शिवाजी महाराजांनीं आपल्या सैनिकांकडे पाहून त्यास असें उत्तर दिलें :- ॥३८॥
शिवाजी राज म्हणाला :-
“ जर तूं शरण आला आहेस, तर ह्या प्रदेशांतून आपल्या सेनेसह निघून जा; आमचें तुला अभय आहे. ” ॥३९॥
हें माझें भाषण तूं येथून त्वरेनें जाऊन मला भिऊन दयेची याचना करणार्या त्या यवनाला सांग. ॥४०॥
ह्याप्रमाणें शिवाजीनें केलेलें गोड भाषण ऐकून दूतानें तें वाट पाहात बसलेल्या आपल्या धन्यास कळविलें. ॥४१॥
त्या दूतानें ( वकिलानें ) शिवाजीकडून जेव्हां अभयवचन आणलें, तेव्हां कारतलवानें त्याच्याकडे खंडणी पाठविली. ॥४२॥
मित्रसेनादि राजे लढत असतांहि त्यांस अभय मिळाल्यावर त्यांनीं आपआपलीं खंडणी त्वरेनें लगेच शिवाजीकडे पाठविलीं. ॥४३॥
लढणार्या त्या यवन सैनिकांस अभयदान येईपर्यंत शिवाजीच्या सैन्यानें लुटलें व चारी बाजूंनीं अडविलें ( कोंडलें ). ॥४४॥
कोणी त्या वेळीं आपली ढाल दुसर्यास देऊन टाकून आपण मुक्त झाला ! कोणी घोड्यावरून त्वरेनें खालीं उतरून आपण भयमुक्त झाला ! ॥४५॥
रत्कानें लाल झालेलें वस्त्र परिधान करणार्या कोणा वीरानें लएच शस्त्रें टाकून जणूं काय संन्यास घेतला ! ॥४६॥
कोणी कर्णभूषणाच्या लोभानें एकाचे कान तोडले अस्तां त्यानें मोत्यें व रत्नें यांचा कंठा लगेच टाकून दिला. ॥४७॥
“ आम्ही शिवाजी राजाकडीलच आहों ” असें म्हणून कांहीं घोडेस्वारांनीं आपणास सोडवून घेतलें. ॥४८॥
कोणाचें मुंडकें तरवारीनें छाटलें गेलें असतां आपणास मारणार्यावर वेगानें धावून जाऊन त्यानें त्याचें मुंडकें चक्रानें तत्काळ उडवून त्यास आपला सोबती केलें ! ॥४९॥
इतक्यांत हात वर करून जणूं काय रागावलेल्याप्रमाणें उंच स्वरानें ओरडणार्या भालदारांनीं शिवाजीच्या आज्ञेनें अरण्यांतील निरनिराळ्या सेनापतींकडे येऊन शत्रूशीं युद्ध करण्याचें सर्वत्र बंद करा म्हणून त्यांस सांगितलें. ॥५०॥५१॥
मग अभय पाप्त झालेले ते मोंगल सैनिक शत्रूच्या रक्षणाखालीं असलेल्या त्या वनांतून भालेल्याप्रमाणें त्वरेनें निघून गेले. ॥५२॥
मग मोंगल आले तसेच शीघ्र गेले; आपले सैनिक गर्जना करूं लागले; तुतार्या वाजूं लागल्या अनेक भालदार नाचत पुढें चालले; प्रचंड जयघोषानें आकाश भरून टाकलें; सुंदर वस्त्रें व सुंदर अलंकार धारण करणारे श्रेष्ठ भाट मोठ्यानें यशःकथा गाऊं लागले; मोंगलांनीं इतस्ततः फेकलेल्या व आंत अपार कोष असलेल्या पेट्या आपले लोक भराभर आणूं लागले; पळून जाणार्य़ा शत्रूंनीं अरण्याच्या मध्यभागीं सोडून दिलेले हत्ती व घोडे सैनिक घेऊन आले; पळालेल्या शत्रूंनीं भाराच्या भीतीनें टाकलेले पुष्कळ हंडे, पेले, झार्या व सोन्याची दुसरींहि पुष्कळ भांडीं यांचे पर्वत आपल्या सेवकांनीं सगळीकडे रचले अशा समयीं आपल्या प्रचंड भुजदंडानें शत्रुसमूहाचें दंडन करणारा शिवाजी सेनापति नेताजीस पाहून बोलूं लागला :- ॥५३॥५४॥५५॥५६॥५७॥५८॥५९॥६०॥
शिवाजी राजा म्हणाला :-
आदिलशहाच्या ताब्यांतील देश पादाक्रांत करण्यास मला जाऊं दे; पण तूं मात्र मोंगलांचा नाश करण्यासाठीं येथेंच राहा. ॥६१॥
युद्धांत कधींहि पाठ न दाखविणारे शत्रु परत गेलेच असें तूं समजूं नकोस; कारण ते मोंगल अभिमानी आहेत. ॥६२॥
पन्हाळगडचा मोबदला लवकर घेऊं इच्छिणारा जो मी त्याचा हा उद्योग तत्काळ सफल झाल्याशिवा राहणार नाहीं. ॥६३॥
ह्याप्रमाणें तेथें त्या उपायज्ञ ( युक्तिवान ) जयशाली शिवाजीनें सेनापतीशीं सल्लामसलत करून स्वारीचा दुंदुभि वाजविण्यास आज्ञा केली. ॥६४॥
मग पहाटेस उत्तम घोड्यावर आरूढ होऊन शिवाजी राजानें सेनासमुदायाच्या योगें शोभणार्या त्या मार्गास ( अधिक ) शोभा आणली. ॥६५॥
क्रमाक्रमानें पुढें जात असतां नगरें, गांवें, गड व अरण्यें हीं शत्रूंनीं सोडून दिलेलीं पाहून त्यास फार संतोष वाटला. ॥६६॥
नंतर दाभोळास ( दाल्भ्यपुरास ) जाऊन दाल्भ्येश्वरास वंदन करून प्रथम तोच देश शिवाजी राजानें वेगानें ( पराक्रमानें ) आपल्या ताब्यांत आणला. ॥६७॥
तेव्हां शिवाजीनें हस्तगत केलेला तो देश यवनांच्या संपर्कांमुळेंच उत्पन्न झालेल्या भीतीपासून मुक्त झाला. ॥६८॥
तेव्हां पालीचा ( पल्लीवनचा ) राजा महाबाहु जसवंत हा आपण पूर्वीं सिद्धी जोहरास केलेलें साह्य आठवून दुष्टांचा काळ जो शिवाजी तो निकट आलेला पाहून, घाबरला व लगेच शृंगारपूरच्या राजाचा त्यानें आश्रय केला. ॥६९॥७०॥
प्रभावलीच्या त्या प्रतापी राजा सूर्यराजानें त्या अपराधी अतएव भ्यालेल्या जसवंतराजाचें जणूं काय आपणाप्रमाणेंच शिवाजीपासून रक्षण केलें. ॥७१॥
पण सूर्यराजाचें व जसवंत राजाचें तें कृत्य शिवाजीस अयोग्य वाटलें नाहीं; कारण ते दोघेहि पराधीन ( यवनाधीन ) होते. ॥७२॥
मग दाभोळामध्यें योग्य अधिकारी नेमून व युद्धास सज्ज असा दोनहजारी सरदार ठेवून पुढें चालला असतां अभय मागणार्यांना अभयदानानें संतुष्ट करून शिवाजी राजा तीन चार दिवसांनीं चिपळुणास गेला. ॥७३॥७४॥
तेथें त्यानें वरदात्या, विश्वविख्यात, चिरंजीवी आणि वर्णनीय चरित्र असलेल्या परशुरामाचें डोळे भरून दर्शन घेतलें. ॥७५॥
नंतर ज्याच्या दोन्हीकडेस काल व काम हे भ्राते आहेत अशा परशुरामाची त्या अत्यंत भक्तिमान शिवाजीनं पूजा केली. ॥७६॥
परशुरामानेंसुद्धां अविंध राजांची रग जिरवून टाकणार्य़ा त्या राजावर मोठी कृपा केली. ॥७७॥
त्या दानशूर व दयळू शिवाजीनें त्या परशुराम क्षेत्रांतील ब्रह्मवृंदास तत्काळ धन देऊन संतुष्ट केलें. ॥७८॥
नंतर मुसलमान अधिकार्यांनीं तत्काळ सोडून दिलेलें, ‘ संगमेश्वरा ’च्या सांनिध्यानें संगमेश्वर नांव पडलेलें व बहुत ब्राह्मण व देवता असलेलें असें नगर आपल्या ताब्यांत आलेलें पाहून तो राजर्षि देवरुखास ( देवर्षिस्थानास ) गेला. ॥७९॥८०॥
तेव्हां त्याच्या आज्ञेनें द्विज निळकंठ, राजाचा पुत्र, निरनिराळ्या युद्धांत प्रसिद्धीस आलेला, पायदळाचा अध्पति योद्धा तानाजी मालुसरे याच्याबरोबर शत्रूच्या हल्ल्यामुळें गोंधळून गेलेल्या संगमेश्वरास आला. ॥८१॥८२॥
ह्या देशाच्या रक्षणार्थ संगमेश्वरामध्यें राहणार्या माझ्या सेनेवर शृंगारपुरांत राहणार्या त्वां मे येईंपर्यंत चांगली देखरेख ठेवावी; वैर टाकावें व माझ्या सांगण्याप्रमाणें करावें असा निरोप विश्वासू दूताकरवीं प्रभावलीच्या राजास त्या राजानें ( शिवाजीनें ) त्या समयीं पाठविला. ॥८३॥८४॥८५॥
नंतर उंडी व बकुळी यांच्या फुलांच्या बहरानें सुगंधित झालेला, नागवेली, नारळी व पोफळी या झाडांची दाटी असलेला, पुष्कळ देवता असलेला, लोकवस्तीमध्यें ब्राह्मणांचें बाहुल्य असलेला उपवनमय डोंगर असलेला, तीर्थमय नदीनद असलेला असा तो प्रदेश तत्काळ आपल्या सत्तेखालीं आणून व राजापूर जिंकून तो श्रेष्ठ राजा शोभूं लागला. ॥८६॥८७॥८८॥
आपल्या बाहुबलानें यवनांचें सैन्य मारून, त्यांचा देश पादाक्रांत करून व शरणागतांस अभयदान देऊन तो इंद्रासारखा, दयाळू, राजाधिराज शिवाजी समुद्रावरील व्यापार्यांच्यायोगें समुद्रानें ज्यास धनाढ्य बनविलें आहे अशा राजापुरांत विशेष विराजमान झाला. ॥८९॥