कामेरीत महिलेस धमकी देऊन सोन्याचे दागिने लांबवले

कामेरीत महिलेस धमकी देऊन सोन्याचे दागिने लांबवले

इस्लामपूर प्रतिनिधी

वाळवा तालुक्यातील कामेरी येथील हॉटेल सिल्व्हरच्या समोर चारचाकी गाडीत बसलेल्या ज्योती चेतन खरात (रा. इंदिरा कॉलनी रस्ता क्र. 4, शिवनगर) या महिलेस मुलाला काहीतरी करेन, अशी धमकी देत सोन्याचे दागिने व मोबाईल असा 65 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी लंपास केला. ही घटना दि. 27 रोजी रत्री 9.15 च्या सुमारास घडली.
ज्योती खरात या आपल्या पती व मुलगा यांच्यासमवेत माहेरी वारणा कोडोली येथे त्यांच्या चारचाकी गाडीने निघाले होते. रात्री 9.15 च्या दरम्यान ते कामेरी गावच्या हद्दीतील हॉटेल सिल्व्हर पॅलेस या ठिकाणी पती चेतन हे कामाचे पैसे घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी गाडीत ज्योती व मुलगा आदिश दोघेच होते. यावेळी तेथे असलेल्या अज्ञात चोरटयाने गाडीचा दरवाजा उघडून पाठीमागील सीटवर ठेवलेल्या हॅन्डबॅग व सॅक मध्ये ठेवलेले सोन्याचे गंठण उचलून घेतले. तसेच गाडीच्या दरवाजाजवळ जात खिडकीत हात घालून तुझ्या मुलास काहीतरी करेन असे म्हणून ज्योती यांच्या गळयातील सोन्याचे दागिने व मोबाईल काढून घेतला. याबाबत ज्योती खरात यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.