राहुल गांधींची रायबरेलीला पसंती

राहुल गांधींची रायबरेलीला पसंती

वायनाडची जागा सोडण्याची घोषणा : प्रियांका वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघाचा राजीनामा देणार असून उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघाचे खासदार म्हणून कायम राहतील. आता प्रियांका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसच्या दोन तासांच्या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी हा निर्णय जाहीर केला.
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागा जिंकल्या. यानंतर राहुल गांधी कोणत्या जागेवरून खासदार राहणार आणि कोणती जागा सोडणार हा प्रश्न कायम होता. अशा स्थितीत सोमवारी या विषयावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी पक्षाच्या सर्व बड्या नेत्यांची बैठक झाली. मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांनीही या बैठकीला हजेरी लावली. अखेर राहुल गांधी यांना रायबरेली मतदारसंघातून खासदार म्हणून कायम ठेवण्याचे शिक्कामोर्तब या बैठकीत करण्यात आले.
बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आमचे नेते राहुल गांधी दोन ठिकाणाहून निवडून आले आहेत. अशा स्थितीत त्यांना एक जागा सोडावी लागणार आहे. त्यांनी रायबरेलीची जागा आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच प्रियांका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवतील अशी माहितीही त्यांनी दिली.
प्रियांका गांधी पोटनिवडणूक लढवणार
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी केरळमधील वायनाडमधून लोकसभा पोटनिवडणूक लढवणार आहेत. खुद्द राहुल गांधी यांनी याला दुजोरा दिला आहे. राहुल यांनी वायनाड सोडल्यामुळे ही जागा रिक्त झाली असून येथे पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी काँग्रेसच्या उमेदवार असतील. रायबरेली आणि वायनाड हे दोन्ही मतदारसंघ मला प्रिय असून दोन्ही ठिकाणी माझे लक्ष असेल असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच निवडणूक प्रचाराच्या काळात वायनाडवासियांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.