पीएम स्व-निधीचे उद्दिष्ट अल्पावधीतच पूर्ण

पीएम स्व-निधीचे उद्दिष्ट अल्पावधीतच पूर्ण

महानगरपालिकेकडे कर्जासाठी मागणी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ
छोट्या व्यावसायिकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी केंद्राची योजना
गंगाधर पाटील/ बेळगाव
शहरामध्ये रस्त्यावर बसून व्यवसाय करण्यासाठी पंतप्रधान स्व-निधी (आत्मनिर्भर) योजनेतून कर्ज देण्याची योजना लागू करण्यात आली. महानगरपालिकेच्या माध्यमातून या कर्जाचे वितरण केले जाते. यामध्ये भाजी विक्रेते, फळ विक्रेते, धोबी यासह इतर लहान-सहान व्यावसायिकांना हे कर्ज दिले जाते. कर्ज वितरणासाठी केंद्र सरकारकडून मनपाला उद्दिष्ट देण्यात आले. ते उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. कर्जासाठी अजुनही मागणी असल्याने केंद्र सरकारने त्यामध्ये पुन्हा वाढ केल्याचे महानगरपालिकेतील पीएम स्व-निधी (आत्मनिर्भर) वितरण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
छोट्या व्यावसायिकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. त्याला व्यावसायिकांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. कर्ज घेऊन त्याची परतफेडही वेळेत हे व्यावसायिक करत आहेत. या व्यावसायिकांना पहिल्यावेळी 10 हजार रुपये कर्ज मंजूर करण्यात येते. त्या कर्जाची वेळेते परतफेड केल्यास दुसऱ्यावेळी 20 हजार रुपये कर्ज दिले जाते. त्याकर्जाची परतफेड केल्यास संबंधितांना 50 हजार रुपये नव्याने कर्ज दिले जाते. सदर कर्ज ऑनलाईनद्वारे तसेच वेळेत कर्ज फेड केल्यास सवलतही दिली जाते, अशी माहिती पंतप्रधान स्व-निधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
काही बँकाचा कर्ज देण्यास नकार
लहान व्यावसायिकांना काही बँका कर्ज देण्यास नकार देत असतात. त्यामुळे सरकारच्या माध्यमातूनच ही योजना राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेकडे अर्ज केल्यानंतर संबंधित बँकेला सर्व कागदपत्रे दिली जातात. यापूर्वी कोणत्याही कर्जाचा थकबाकीदार नसेल तर निश्चितच संबंधितांना कर्ज दिले जाते. मात्र थकीत कर्जदार असेल तर त्याला कर्ज दिले जात नाही. या योजनेमुळे लहान व्यावसायिकांना मोठा फायदा झाला असून 20 जून 2024 पर्यंत 11,133 जणांना कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
लहान व्यावसायिकांना कर्ज मिळत असल्यामुळे दिलासा
महानगरपालिकेला पहिल्यांदा कर्ज वितरणासाठी 8727 जणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण झाले. याचबरोबर महानगरपालिकेने दुसऱ्यावेळीही दिलेल्या कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. उद्दिष्टापेक्षाही अधिकच कर्ज देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तिसऱ्या वेळी कर्ज घेणाऱ्यांचे उद्दिष्ट केवळ 353 जणांचे दिले होते. मात्र महानगरपालिकेकडून 477 जणांना कर्ज दिले आहे.  लहान व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी हे कर्ज मिळत असल्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र यामध्ये वाढ करावी, अशी मागणी व्यावसायिकांची आहे.
10,864 जणांना देण्यात येणार कर्ज
सदर योजना सुरू केल्यानंतर पहिल्या टप्प्यासाठी 8727 जणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, कर्जाची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे केंद्र सरकारनेही त्यामध्ये वाढ केली आहे. आता त्यामध्ये वाढ करून पहिल्या टप्प्यासाठी दरवर्षी 10,864 पात्र व्यावसायिकांना कर्ज दिले जाणार आहे.