पतंजलिने रोखली 14 उत्पादनांची विक्री

पतंजलिने रोखली 14 उत्पादनांची विक्री

कंपनीने सर्वोच्च न्यायालयाला दिली माहिती : दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पतंजलिने 14 उत्पादनांची विक्री रोखली असल्याची माहिती पतंजलि आयुर्वेद लिमिटेडने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणाने एप्रिल महिन्यात ज्या उत्पादनांचा परवाना निलंबित केला होता, त्या उत्पादनांची विक्री रोखण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. इंडियन मेडिकल असोसिएशनकडून दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी पार पडली. याप्रकरणी पुढील सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे.
5,605 फ्रेंचाइजी स्टोअर्सना देखील संबंधित उत्पादने मागे घेण्याचा निर्देश जारी केला आहे. याचबरोबर मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून या 14 उत्पादनांशी निगडित सर्व जाहिराती मागे घेण्याचा निर्देश दिला असल्याचे पतंजलिने न्यायाधीश हिमा कोहली आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाला सांगितले आहे.
खंडपीठाने पतंजलि आयुर्वेद लिमिटेडला दोन आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा निर्देश दिला आहे. जाहिराती हटविण्यासाठी सोशल मीडिया मध्यस्थांना करण्यात आलेली विनंती स्वीकारण्यात आली का आणि संबंधित 14 उत्पादनांशी निगडित सर्व जाहिराती हटविण्यात आल्या का हे या प्रतिज्ञापत्रात नमूद करावे लागणार आहे.
तत्पूर्वी उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणाने पतंजलि आयुर्वेद लिमिटेड आणि दिव्य फार्मसीच्या 14 उत्पादनांच्या निर्मिती परवान्याला तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली होती.