पॅट कमिन्सच्या कांगारुंचीच दादागिरी

दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर 79 धावांनी विजय : मालिकेवरही कब्जा वृत्तसंस्था/ मेलबर्न पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने बॉक्सिंग डे कसोटीत पाकिस्तानचा 79 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑसी संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. पाकविरुद्ध दोन्ही डावात 10 बळी घेणारा ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्स  सामन्याचा हिरो ठरला. उभय संघातील तिसरा व […]

पॅट कमिन्सच्या कांगारुंचीच दादागिरी

दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर 79 धावांनी विजय : मालिकेवरही कब्जा
वृत्तसंस्था/ मेलबर्न
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने बॉक्सिंग डे कसोटीत पाकिस्तानचा 79 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑसी संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. पाकविरुद्ध दोन्ही डावात 10 बळी घेणारा ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्स  सामन्याचा हिरो ठरला. उभय संघातील तिसरा व शेवटचा कसोटी सामना दि. 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवण्यात येईल.
मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 318 धावा केल्या यानंतर प्रत्युतरात खेळताना पाकचा पहिला डाव 264 धावांवर आटोपला व यजमान ऑसी संघाला 54 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात खेळताना ऑसी संघाला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही, त्यांचा डाव 262 धावांवर संपुष्टात आला व पाकला विजयासाठी 317 धावांचे टार्गेट मिळाली. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकला 237 धावापर्यंतच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने हा सामना 79 धावांनी जिंकताना सरत्या वर्षाचा शेवट विजयाने केला.
ऑस्ट्रेलिया संघाने तिसऱ्या दिवसाची सुरुवात 6 विकेट्सच्या नुकसानीवर 187 धावांनी केली. कॅरेने तळातील फलंदाजांना सोबत घेत संघाची धावसंख्या 262 पर्यंत पोहोचवली. कॅरेने 8 चौकारासह 53 धावांचे योगदान दिले. कर्णधार कमिन्स 16 तर नॅथन लियॉनने 11 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 96 धावा फटकावल्या तर स्टीव्ह स्मिथनेही अर्धशतकी खेळी साकारली. दरम्यान, कॅरे बाद झाल्यानंतर कांगारुंचा दुसरा डाव 84.1 षटकांत 262 धावांवर संपुष्टात आला. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदी व हमजाने प्रत्येकी चार बळी घेतले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव संपुष्टात आल्यानंतर पाकला विजयासाठी 317 धावांचे आव्हान मिळाले.
कमिन्स, स्टार्कसमोर पाक फलंदाजांच लोटांगण
पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही पाक फलंदाजांना ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर तग धरता आले नाही. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 17 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना पाकचा डाव 67.2 षटकांत 237 धावांवर संपला. सलामीवीर अब्दुल्लाह शफीक 4 तर इमाम उल हक 12 धावा काढून तंबूत परतला. कर्णधार शान मसूदने सर्वाधिक 7 चौकारासह 60 धावा केल्या तर बाबर आझमने 41 धावा करत त्याला चांगली साथ दिली. ही जोडी बाद झाल्यानंतर आगा सलमानने अर्धशतकी खेळी करताना 50 धावांचे योगदान दिले तर मोहम्मद रिझवानने 35 धावा केल्या. सलमान व रिझवान बाद झाल्यानंतर मात्र इतर पाक फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. जमाल व शाहिन आफ्रिदी, मीर हमजा या तळाच्या खेळाडूंना भोपळाही फोडता आला नाही.
ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 49 धावांत 5 बळी घेत पाकचा डाव गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. मिचेल स्टार्कनेही 55 धावांत 4 गडी बाद केले. याशिवाय, हॅजलवूडनेही एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया पहिला डाव 318 व दुसरा डाव 84.1 षटकांत सर्वबाद 264 (मिचेल मार्श 96, स्टीव्ह स्मिथ 50, अॅलेक्स कॅरे 53, शाहिन शाह आफ्रिदी व मीर हमजा प्रत्येकी चार बळी)
पाकिस्तान पहिला डाव 264 व दुसरा डाव 67.2 षटकांत सर्वबाद 237 (शान मसूद 60, आगा सलमान 50, मोहम्मद रिझवान 35, सौद शकील 24, बाबर आझम 41, कमिन्स 49 धावांत 5 बळी, स्टार्क 55 धावांत 4 बळी, हॅजलवूड 34 धावांत 1 बळी).
 28 वर्षे, 16 पराभव, पाकिस्तानची ऑस्ट्रेलियातील विजयाची पाटी कोरीच
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानने पहिल्या कसोटीत 360 धावांनी सपाटून मार खाल्ला होता. यानंतर दुसऱ्या कसोटीत त्यांना विजयासाठी 317 धावांचे लक्ष्य मिळाले. हे आव्हान पूर्ण करत त्यांना मालिकेत बरोबरी साधण्याची नामी संधी होती. पण, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजासमोर पाक फलंदाजांनी पुन्हा सपशेल नांगी टाकली. दुसऱ्या कसोटीत त्यांना 79 धावांनी हार पत्करावी लागली. या पराभवासह पाकिस्तानची मागील 28 वर्षाची ऑस्ट्रेलियातील पराभवाची मालिका कायम राहिली. पाकने ऑस्ट्रेलियात आपला शेवटचा विजय 1995-96 मध्ये नोंदवला होता. यानंतर आजपर्यंत 28 वर्षात 16 कसोटी सामने झाले, या सर्व सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीतही बदल
भारत व दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी संपल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023-25 स्पर्धेच्या गुणतालिकेतही मोठा बदल झाला आहे. एका पराभवाने भारतीय संघाला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. पाकिस्तानलाही पराभवामुळे चांगलाच दणका बसला आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेला मात्र मोठा फायदा झाला आहे. सेंच्युरियन कसोटीत पराभव झाल्यानंतर भारताची डब्ल्यूटीसी पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान होता. मात्र, आता भारत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकन संघ एका विजयासह थेट गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे. पाकिस्तानची दुसऱ्या स्थानावरुन थेट पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
  पॅट कमिन्ससाठी यंदाचे वर्ष ठरले स्वप्नवत
2023 हे वर्ष संपण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. यंदाच्या क्रिकेट विश्वात अनेक धमाकेदार गोष्टी पहायला मिळाल्या. पण, यंदाच्या वर्षाचा जबरदस्त फायदा झाला तो ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला. आयसीसी वर्ल्डकपमध्ये सुरुवातीचे सामने गमावल्यानंतर कमिन्सच्या ऑस्ट्रेलियन संघाने जबरदस्त कामगिरी करताना तब्बल सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकण्याची किमया केली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना देखील भारत व ऑस्ट्रेलियात झाला. लंडनमध्ये झालेला हा अंतिम सामना देखील कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने जिंकला. यंदाच्या आयपीएल लिलावात देखील कमिन्सला 20.50 कोटी रुपयांची बोली लागली. हैदराबाद संघाने त्याला खरेदी केले. याशिवाय, सरत्या वर्षाच्या शेवटी पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑसी संघाने केली.