विरियातोंच्या विधानाला ग्रेफन्स फर्नांडिस यांचा आक्षेप

विरियातोंच्या विधानाला ग्रेफन्स फर्नांडिस यांचा आक्षेप

…तर लोकसभा निवडणुकीत कामच केले नसते
मडगाव : बाणावलीतील जिल्हा पंचायत पोटनिवडणूक 23 रोजी पार पडणार असून या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यातील काँग्रेसचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी अपक्ष उमेदवाराबाबत केलेल्या विधानाला अपक्ष उमेदवार ग्रेफन्स फर्नांडिस उर्फ पोपू यांनी आक्षेप घेतला आहे. आम्ही मागील दारातून भाजपला प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो, तर विरियातो यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकून आणण्यासाठी जिवाचे रान केले नसते, असे ग्रेफन्स यांनी बाणावली येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.यावेळी बाणावली पंचायत सरपंच झेवियर पेरेरा, माजी जिल्हा पंचायत सदस्य मारिया रिबेलो, पंच आणि उमेदवार फर्नांडिस यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण विरियातो फर्नांडिस यांच्यासाठी सांयकाळी 5 पर्यंत मतदारांना बाहेर काढण्यासाठी वावरत राहिला.
त्यांना बाणावलीतून भरघोस मताधिक्य मिळाले. त्यात आमचे योगदान आहे हे त्यांनी लक्षात घेणे गरजेचे होते. कोणी सांगितले म्हणून आमचे भाजपला मागील दाराने आणण्याचे प्रयत्न आहेत असे म्हणणे योग्य नाही. माझे आई-वडील नव्हे, तर आजोबा-पणजोबा यांनी सुद्धा काँग्रेससाठीच मतदान आणि काम केल्याचे उमेदवार फर्नांडिस यांनी सांगितले. बाणावली सरपंच पेरेरा यांनी ग्रेफन्स हे लोकांचे उमेदवार असल्याचे सांगितले तसेच खासदार विरियातो यांच्या विधानाचा कडक शब्दांत समाचार घेतला. रॉयला फर्नांडिस यांनी काँग्रेसने तिकीट दिली, तरी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले होते. म्हणून आम्ही ग्रेफन्स यांना पुढे केले. मात्र उमेदवारी दाखल करून रॉयला यांनी पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका सरपंचांनी केली.
लहानसहान निवडणुकांत मोठ्या नेत्यांनी का लक्ष घातले आहे हे कळत नाही. ही निवडणूक तळागाळातील कार्यकर्त्यांवर सोडून देणे योग्य ठरले असते. या नेत्यांनी इंधन दरवाढ व अन्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांवर, उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत केले आसते, तर चांगले झाले असते, असे माजी जि. पं. सदस्य रिबेलो म्हणाल्या. कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना विधान करण्याची गरज का भासली. आमदार वेंझी व्हिएगस, एल्टन डिकॉस्ता आणि अन्य इंडी आघाडीतील नेत्यांनी का भाष्य केले नाही. तुम्ही आम्हाला गृहीत धरू पाहत आहात का?, आम्ही कित्येक दशकांपासून काँग्रेससोबत आहोत. कॅप्टन विरियातो यांचा अलीकडेच या पक्षाशी संबंध आला आहे, त्यांनी टीका करणारी विधाने करताना ध्यानात ठेवावे, असा सल्ला बाणावलीचे पंच मनोज केसरकर यांनी दिला.