मंत्री जारकीहोळींची धूपदाळ जलाशयाला भेट

मंत्री जारकीहोळींची धूपदाळ जलाशयाला भेट

भविष्यातील योजना हाती घेण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : गोकाक तालुक्यातील धूपदाळ गावामध्ये घटप्रभा आणि हिरण्यकेशी नदीवर निर्माण करण्यात आलेल्या जलाशयाला पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी भेट देऊन पाण्याच्या पातळीची पाहणी केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची जाणवणारी कमतरता लक्षात घेत मंत्री जारकीहोळी यांनी यावेळी अधिकाऱ्यांशी पाण्याची पातळी वाढविण्याच्यादृष्टीने भविष्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबतही चर्चा केली. पाण्याची पातळी वाढविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या योजनेचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली. या धरणांच्या व्याप्तीमध्ये पाणीपातळी वाढविण्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना अधिक मदत मिळणार आहे. तसेच दुष्काळ परिस्थितीमध्ये नागरिकांसह जनावरांना पाण्याची सोय होणार आहे, असे त्यांनी सांगितले. हिडकल जलाशयातून 2 टीएमसी पाणी सोडले दि. 1 एप्रिलपासून हिडकल जलाशयातून 2 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे हिडकल जलाशयातून घटप्रभा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. बागलकोट अन् इतर भागातील शेतकऱ्यांना या पाण्याचा उपयोग होणार आहे. यासाठी 2 टीएमसी पाणी राखून ठेवले होते. दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे पाण्याचा योग्य प्रकारे वापर करावा, असे आवाहन केले. यावेळी राजीव दुर्गशट्टी, महांतेश मगदूम, आरिफ पिरजादे, आनंद कुलकर्णी, बी. आर. कळसा, विनोद एच. उपस्थित होते.