विमानतळावरील इंग्रजी-हिंदी फलकांवर कन्नड विकास प्राधिकरणाची वक्रदृष्टी

विमानतळावरील इंग्रजी-हिंदी फलकांवर कन्नड विकास प्राधिकरणाची वक्रदृष्टी

सर्वत्र कन्नडचा वापर करण्यासाठी दबाव
प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या बेळगाव विमानतळावर आसपासच्या परिसरातील प्रवाशांची संख्या अधिक असल्याने या ठिकाणी इंग्रजी व हिंदीचा अधिकाधिक वापर होत होता. परंतु, ही गोष्ट कन्नड संघटनांच्या डोळ्यांत खुपत होती. यापूर्वी अनेकवेळा बेळगाव विमानतळावरील सर्व फलक कन्नडमध्येच करावेत, अशी मागणी होत असतानाच आता कन्नड विकास प्राधिकरणाने विमानतळ प्रशासनाला पत्र पाठवून सर्व फलक कन्नडमध्ये करण्याच्या सूचना केल्या आहेत.
बेळगाव विमानतळावरून केवळ बेळगावच नाही तर बाजूच्या कोल्हापूर, सांगली, चंदगड, गोवा व कोकणातून प्रवासी ये-जा करतात. बाहेरील प्रवाशांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या सोयीसाठी इंग्रजी-हिंदी या भाषांमध्ये सूचना फलक लावण्यात आले होते. बाहेरील प्रवाशांनाही प्रवास करणे, तसेच माहिती घेणे सोयीचे होत होते.
नेहमीच कानडीकरणाचा घाट घालणाऱ्या काही कानडी संघटनांनी यापूर्वीही विमानतळावर कानडीमध्येच फलक लावावेत, अशी मागणी केली होती. बेळगाव जिल्ह्यात व्यापार, पर्यटन, उद्योग यासाठी देशभरातील नागरिकांची ये-जा असते. परंतु, हे बाजूला ठेवून केवळ बेळगाववर आपला हक्क दाखवून देण्यासाठी कन्नड भाषेतच फलक लावण्याची सक्ती करण्यात येत आहे.
कन्नड विकास प्राधिकरणाने बुधवार दि. 26 रोजी एक पत्रक बेळगाव विमानतळाला पाठविले आहे. विमानतळावरील बॅरिकेड्स, सार्वजनिक माहिती फलक हे इंग्रजी व हिंदीमध्ये असल्याने स्थानिक कन्नड भाषिकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे या सर्व ठिकाणी, तसेच जाहिरातींमध्ये कन्नडचाच वापर करावा, अशा सूचना विमानतळ प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. यामुळे इतर भाषिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.