तावरेच्या माध्यमांतून हे पाप कोणाचं…’ससून’मधील गैरकारभारावर सरकारला घेरणार- नाना पटोले
अनेक गैरकृत्यांचे आरोप असणाऱ्या वादग्रस्त डॉ. अजय तावरेची अधीक्षक म्हणून शिफारस होतेच कशी ? असा सवाल करून हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून संबंधित मंत्र्यांनीच अधिष्ठाता काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. तसेच ससून मध्ये चाललेल्या गंभिर प्रकरणावर तसेच पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावर येत्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला घेरणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण सरकारसह मंत्री हसन मुश्रीफ यांना भोवणार असं चित्र दिसत आहे.
पुण्यातील कल्याणीनगर मधील अलिशान पोर्शे कार हिट अँड रन प्रकरणामध्ये दिवसेंदिवस अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ससून हॉस्पिटलचे डिन डॉ. विनायक काळे यांनी वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं नाव घेतल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. त्यामुळे सरकारकडून तातडीने हालचाल करून डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.
आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार टिका केली. यावेळी बोलताना त्यांनी “या प्रकरणामध्ये ते पत्र सर्व माध्यमांसमोर आलेलं आहे. यामध्ये आमदार टिंगरे यांनी शिफारस केल्याने तसेच मंत्र्यांनी शेरा मारल्याने डॉ. तावरे यांची नियुक्ती झाल्याचं समोर आलं आहे. मुळात या तावरे यांची कारकिर्द वादग्रस्त असताना त्यांची नेमणुक केलीच का ? त्यामुळे तावरेच्या माध्यमातून निर्माण झालेलं हे पापाला जबाबदार कोण ? राज्यात शेतकरी दुष्काळामध्ये मरत आहेत. लोक गाडीखाली चिरडले जात आहेत. तरीही या भाजप्रणित सरकारला याचं काही देण घेण नाही.” असं त्यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी, या हिट आणि रन प्रकरणावर येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये सवाल उपस्थित करणार असून या द्वारे सरकारला घेरणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापणार असून वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.