बापट गल्ली कार पार्किंगची जागा मनपाच्या ताब्यात?

प्रतिनिधी/ बेळगाव बापट गल्लीतील बहुमजली कार पार्किंग प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासून रखडला आहे. त्यातच त्या ठिकाणी काही जणांकडून कार पार्किंग करणाऱ्यांकडून बेकायदेशीररित्या शुल्क आकारले जात असल्याचा आरोप होता. याबाबत अर्थ व कर स्थायी समिती बैठकीत चर्चा होऊन यावर कारवाईची सूचना अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानुसार दि. 11 रोजी महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बापट […]

बापट गल्ली कार पार्किंगची जागा मनपाच्या ताब्यात?

प्रतिनिधी/ बेळगाव
बापट गल्लीतील बहुमजली कार पार्किंग प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासून रखडला आहे. त्यातच त्या ठिकाणी काही जणांकडून कार पार्किंग करणाऱ्यांकडून बेकायदेशीररित्या शुल्क आकारले जात असल्याचा आरोप होता. याबाबत अर्थ व कर स्थायी समिती बैठकीत चर्चा होऊन यावर कारवाईची सूचना अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानुसार दि. 11 रोजी महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बापट गल्ली कार पार्किंगची जागा ताब्यात घेतली आहे.
स्मार्ट सिटी योजनेतून बापट गल्ली कार पार्किंग येथे बहुमजली कार पार्किंग उभारण्याची योजना होती. नियोजित कार पार्किंगचा आराखडा व स्ट्रक्चरदेखील तयार करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर लोकप्रतिनिधींनी जागेचे भूमिपूजनही केले होते. पण गेल्या दोन वर्षांपासून बहुमजली कार पार्किंग प्रकल्प केवळ कागदावरच राहिला आहे. प्रत्यक्षात काम सुरू होत नसल्याने त्या ठिकाणी पार्किंग करणाऱ्या काही जणांकडून बेकायदेशीररित्या शुल्क वसूल केले जात आहे, अशा तक्रारी होत्या. त्यानुसार मंगळवारी महापालिका महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी बापट गल्ली कार पार्किंगला भेट देऊन सदर जागा महापालिकेच्या ताब्यात घेतली आहे. तसेच तालिकोटी यांनी खडेबाजार स्थानकात हजेरी लावली होती. शुल्क वसूल करणाऱ्या विरोधात त्यांनी तक्रार दिल्याची चर्चा होती. याबाबत पोलिसांना विचारणा केली असता. मनपाकडून कोणत्याही प्रकारची तक्रार आली नसल्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी यांनी सांगितले. तर महसूल उपायुक्त  तालिकोटी यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता बहुमजली कार पार्किंगच्या व्हेरिफिकेशनचे काम सुरू असल्याचे त्यांनी ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’शी बोलताना सांगितले.