वळीव पावसाने शहर परिसराला झोडपले

पहिल्याच दमदार पावसाने उडविली तारांबळ : झाड कोसळून कारचे नुकसान, काही भागात वीजपुरवठा खंडित बेळगाव : शहरवासियांना प्रतीक्षा असलेल्या वळीव पावसाने शुक्रवारी शहरासह उपनगरांना चांगलेच झोडपून काढले. जोरदार वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह सायंकाळी 4 च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. या पावसाने साऱ्यांचीच दाणादाण उडविली. अनेक ठिकाणी गटारी भरून रस्त्यांवरून पाणी वाहत होते. या […]

वळीव पावसाने शहर परिसराला झोडपले

पहिल्याच दमदार पावसाने उडविली तारांबळ : झाड कोसळून कारचे नुकसान, काही भागात वीजपुरवठा खंडित
बेळगाव : शहरवासियांना प्रतीक्षा असलेल्या वळीव पावसाने शुक्रवारी शहरासह उपनगरांना चांगलेच झोडपून काढले. जोरदार वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह सायंकाळी 4 च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. या पावसाने साऱ्यांचीच दाणादाण उडविली. अनेक ठिकाणी गटारी भरून रस्त्यांवरून पाणी वाहत होते. या पावसाने अनेकांच्या घरांमध्येही पाणी शिरले होते. पावसाबरोबरच जोरदार वाऱ्यामुळे झाडे कोसळून वाहनांचे नुकसान झाल्याच्या घटनाही घडल्या. पहिल्याच दमदार पावसाने साऱ्यांचीच तारांबळ उडविली आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्म्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत होती. पाऊस कधी पडेल, याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून होते. दोन दिवसांपूर्वी पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर पावसाने पुन्हा उसंत घेतली होती. त्यामुळे आणखी उष्म्यामध्ये वाढ झाली होती. सकाळपासूनच आकाशात ढग दिसत होते. त्यामुळे पाऊस येईल, अशी अपेक्षा होती. सायंकाळी 4 च्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. 4.30 नंतर पावसाने अधिकच जोर धरला. मोठ्या पावसामुळे गटारी तुडुंब भरून वाहत होत्या.
गटारींमध्ये कचरा अडकल्याने पाणी रस्त्यांवरून वाहत होते. यामुळे रस्त्यांवर कचरा पसरला होता. दमदार पावसाला सुरुवात झाल्याने बाजारपेठेतील फेरीवाले, भाजीविक्रेते आणि इतर बैठ्या व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे साऱ्यांना आडोसा शोधावा लागला. मात्र दमदार पाऊस कोसळल्याने अनेक व्यावसायिकांचे साहित्य भिजून नुकसान झाले. पावसाला जोरदार सुरुवात झाल्याने दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना आडोसा शोधावा लागला. तब्बल एक तास पाऊस कोसळला. यावर्षी पहिल्यांदाच शहरामध्ये हा मोठा वळीव पाऊस कोसळला. त्यामुळे हवेमध्ये काही प्रमाणात गारवा निर्माण झाला. उन्हापासून संरक्षण घेण्यासाठी आणलेल्या छत्र्यांचा वापर पावसापासून बचाव करण्यासाठी करण्यात आल्याचे चित्र पहायला मिळाले. शहरातील अनेक बसथांब्यांवर प्रवासी थांबले होते. वारा आणि पावसामुळे अनेकांना भिजतच त्या ठिकाणी थांबावे लागले. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचून होते. त्यामधून वाट काढताना पादचाऱ्यांना कसरत करावी लागली. गटारीतील पाणी रस्त्यांवरून वाहत असल्यामुळे रस्त्यावर कचरा विखुरल्याचे दिसून आले. जोरदार वारा आणि विजांमुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. काही ठिकाणी झाडांच्या फांद्यादेखील कोसळल्या.
झाड कोसळून कारचे नुकसान
अनगोळ येथील संतमीरा स्कूलच्या समोरच मारुती ओम्नी पार्किंग करण्यात आली होती. जोरदार वाऱ्यामुळे कारवर झाड कोसळल्यामुळे नुकसान झाले. सुदैवानेच या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. शाळेला सुटी असल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात होते.
पहिल्याच पावसाने दुकानांमध्ये शिरले पाणी
जुना पी. बी. रोडवर काही वर्षांपूर्वी ओव्हरब्रिजची उभारणी करण्यात आली आहे. या ओव्हरब्रिजला लागूनच अत्यंत लहान सर्व्हिस रस्ता आहे. त्या परिसरात अनेक दुकानदार व्यवसाय करत आहेत. मात्र दरवर्षी त्यांना पावसाचा फटका बसत आहे. शुक्रवारी पावसामुळे गटारी तुडुंब भरून दुकानांमध्ये घाण पाणी गेल्याने दुकानदारांची तारांबळ उडाली. या प्रकारामुळे व्यावसायिकांतून मनपाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.