गुंजी परिसरात गव्यांकडून भात पिकांचे प्रचंड नुकसान

गुंजी परिसरात गव्यांकडून भात पिकांचे प्रचंड नुकसान

गव्यांच्या सततच्या उपद्रवामुळे शेतकरी हवालदिल : बंदोबस्त करण्याकडे वनखात्याचे दुर्लक्ष
वार्ताहर /गुंजी
गुंजी परिसरातील शेतकऱ्यांच्या भात पिकांचे गव्यांकडून प्रचंड नुकसान होत असून येथील शेतकरी त्यांच्या सततच्या उपद्रवामुळे हवालदिल झाला आहे. सुरुवातीपासूनच या परिसरात गव्यांकडून भात पिकांचे नुकसान होत आहे. सायंकाळ होताच हे गवे दररोज वेगवेगळ्या भागातील भात पिकात शिरून खाऊन, तुडवून नुकसान करीत असल्याने येथील शेतकऱ्यांच्या भात पिकाची प्रचंड नासाडी होत आहे. त्यामुळे येथील शेतकरी शेती करावी की नको? अशा अवस्थेत चिंताग्रस्त बनला आहे.
सात-आठ गव्यांचे दोन-तीन कळप या भागात उपद्रव करीत असून दररोज वेगवेगळ्या भागात भात शेतीचे नुकसान होणे नित्याचेच ठरले आहे. काटेरी कुंपण, बॅटरीचा प्रकाशझोत, फटाके, कंदील, शेकोट्या त्याचबरोबर भोंगेही त्यांच्या अटकावासाठी कुचकामी ठरत असल्याने येथील शेतकरी वर्ग पुरता हतबल झाला आहे. सध्या या भागामध्ये भातलागवडीचे काम सुरू असून भात लागवडीसाठी तयार केलेले भात वाफेच गवे खाऊन फस्त करत असल्याने भात लागवड करावी तरी कशी करावी, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. सुरुवातीच्या काळात पावसाने व्यवस्थित साथ दिली नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरणी खोळंबल्यामुळे भातलागवडीचा निर्णय घेण्यात आला. मात्र जंगली प्राण्यांच्या या उपद्रवामुळे भात लागवड करणे कठीण बनले आहे. लागवडीवेळीच तयार केलेले भातवाफेही गव्यांनी खाऊन फस्त केल्याने येथील शेतकऱ्यांसमोर मोठा पेचप्रसंग उद्भवला आहे.
गतवर्षीची नुकसानभरपाई नाही
येथील शेतकऱ्यांना अरण्य खात्यामार्फत नुकसानभरपाई दिली जाते. मात्र सदर नुकसानभरपाई अत्यंत तुटपुंजी आणि वेळेत दिली जात नाही. गतवर्षी येथील शेतकऱ्यांच्या नुकसान केलेल्या भात पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत. काही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली असली तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने अशा शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वनखात्यास भरपाईविषयी विचारले असता भात कापणीस आल्यानंतरच नुकसान झाले तर भरपाई दिली जाणार. अन्यथा एरव्ही नुकसान झाल्यास  पंचनामा करता येणार नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात असून सध्या भातपीक राहिले तरच ते नंतर कापणीस येईल, अन्यथा ते कापणीस कसे येईल, असा खेदजनक सवालही शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घेऊन गव्यांचा बंदोबस्त करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
चारा समस्येत भर
शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांच्या चाऱ्यांसाठी शेतामध्ये मका, कडवळ, बाजरी पिके घेतली आहेत. मात्र गव्यांकडून चारा पिकेही फस्त करीत असल्याने याचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यामुळे जनावरे पाळायची कशी, असा पेच निर्माण होत आहे.