श्रीरामभक्तीत प्रति दिवाळी साजरी
भल्या पहाटेपासून सायंकाळी उशिरापर्यंत भरगच्च कार्यक्रम : गोव्यातील सर्व मंदिरे, घरे, रस्ते, चौक भगव्या गुढ्यांनी सजले
पणजी : अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण गोव्यातील शहर तसेच ग्रामीण भागातही सर्वत्र भक्तिभावाने भारलेले राममय वातावरण निर्माण झाले आहे. बहुतेक सर्व मंदिरांमध्ये दिंड्या, रामनामजप, कलश मिरवणुका तसेच श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन, आरत्या, महाप्रसाद करण्यात आला. संध्याकाळी घराघरांमध्ये आकाशकंदिल, पणत्या पेटवून दुसरी दिवाळी साजरी करण्यात आली. भजन, कीर्तन तसेच ‘गीत रामायण’ कार्यक्रमही अनेक ठिकाणी झाले. गेल्या दोन दिवसांपासून गावागावांतून तसेच शहरातून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्रीरामनामाचा जयघोष करीत मिरवणुका काढण्यात आल्या. दुपारी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर सायंकाळी अनेक ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. मंदिरांमध्ये तसेच घरोघरी आणि रस्त्यांच्या दुतर्फा, मुख्य सार्वजनिक ठिकाणी पताका, भगवे झेंडे, श्रीरामांची प्रतिमा असलेले झेंडे तसेच मोठमोठे बॅनर्स, कटआऊट्स लावण्यात आले होते. त्यामुळे सारे वातावरण राममय झाले आहे.
पहाटेपासून श्रीरामांचा जयघोष
पहाटेपासून राज्यातील मंदिरांमध्ये लाऊडस्पीकर सुरू झाले. त्यावर फक्त श्रीरामाच्या जयघोषाची हिंदी, मराठी गाणी वाजविण्यात आली. अनेक ठिकाणी सकाळी कलश मिरवणूक काढण्यात आली. सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने सर्व मंदिरांमधील दिवसभरातील सर्व कार्यक्रमांना मोठी गर्दी दिसून येत होती. लहान मुलांपासून युवक, युवती तसेच ज्येष्ठ नागरिकही भक्तिभावाने सहभागी झाले होते. सुवासिनींतर्फे सायंकाळी मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. अनेक पणत्या उजळल्याने सारा परिसर चैतन्यमय होऊन गेला.
मुख्यमंत्र्यांकडून मंदिरांना भेटी
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकाळी त्यांच्या सांखळी मतदारसंघातील विविध मंदिरांमध्ये सपत्निक देवदर्शन घेतले. पूजा, प्रार्थना व इतर धार्मिक विधी केले. देवदर्शनासाठी अनेक मंदिरांमध्ये सकाळपासून रांगा लागल्या होत्या. दुपारी अयोध्येत राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा गोव्यातील मंदिरांमध्येही रामनामाचा जयघोष करण्यात आला. रामनामाचा जप अखंड चालू होता.
पर्वरीत श्रीराम ज्योती कार्यक्रम
संध्याकाळी दिंडी, भजने व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम झाले. पणजी-भाटलेतील तसेच कोलवाळ, पर्वरीत श्रीवडेश्वर, करमळी, चिंबल, डोंगरी, गिमोणे, काणकोण तसेच इतर ठिकाणच्या राममंदिरांसह अन्य मंदिरांमध्येही गर्दी होती. श्री राम ज्योती प्रज्वलित करण्याचा शासकीय पातळीवरील प्रमुख कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता पर्वरी येथे झाला. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी राज्यात सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सामान्य लोकांप्रमाणे राज्यातील सर्व मंत्री, आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील मंदिरांमध्ये दिवसभर पूजा महाआरती केली. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी मंदिरांमध्ये महाप्रसादही ग्रहण केला. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते तसेच लोकांनी आपापल्या भागातील मंदिरांची साफसफाई केली होती. सर्वच मंदिरांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. अयोध्येत होणारा श्रीराममूर्ती प्रतिष्ठापना सोहळा लाईव्ह पाहता यावा, यासाठी सर्व मंदिरांमध्ये मल्टिमीडिया प्रोजेक्शनची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.
Home महत्वाची बातमी श्रीरामभक्तीत प्रति दिवाळी साजरी
श्रीरामभक्तीत प्रति दिवाळी साजरी
भल्या पहाटेपासून सायंकाळी उशिरापर्यंत भरगच्च कार्यक्रम : गोव्यातील सर्व मंदिरे, घरे, रस्ते, चौक भगव्या गुढ्यांनी सजले पणजी : अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण गोव्यातील शहर तसेच ग्रामीण भागातही सर्वत्र भक्तिभावाने भारलेले राममय वातावरण निर्माण झाले आहे. बहुतेक सर्व मंदिरांमध्ये दिंड्या, रामनामजप, कलश मिरवणुका तसेच श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन, आरत्या, महाप्रसाद करण्यात आला. संध्याकाळी घराघरांमध्ये आकाशकंदिल, पणत्या […]