बिडी-झुंजवाड रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

बिडी-झुंजवाड रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

वार्ताहर /नंदगड
बिडी-झुंजवाड के. एन. रस्त्यादरम्यान मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारक व पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. शिवाय लहान अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे. खानापूर-यल्लापूर राज्य मार्गाला खानापूर-तालगुप्पा रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यापैकी बिडीपासून झुंजवाड के. एन. पर्यंतच्या सहा कि. मी. रस्त्यादरम्यान ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर साईडपट्ट्या पूर्णत: खराब झाल्या आहेत. यामुळे खड्ड्यात पडून वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
बेळगावहून-मंगळूरला जाण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्यादरम्यान झुंजवाड, बेकवाड, कुणकीकोप्प, बिडी आदी गावे येतात. शिवाय याच रस्त्यावरुन बिडीपासून कित्तूरमार्गे धारवाड, हुबळी व नंदगडमार्गे हलशी, नागरगाळी, दांडेली, बेकवाडमार्गे इटगी, पारिश्वाड, एम. के. हुबळी आदी ठिकाणी संपर्क साधला जातो. त्यामुळे तालुक्यातील निम्म्या भागात संपर्क होतो. खानापूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध कामांसाठी रोज शेकडो लोक चारचाकी, दुचाकीवरुन याच रस्त्यावरुन खानापुरात येतात. तालुक्यात जंगल अधिक असल्याने पावसाळ्यात तब्बल चार महिने येथे बऱ्यापैकी पाऊस पडतो. पावसाळ्यात वाहने घसरण्याचे प्रकार सर्रास पहावयास मिळतात. एखाद्या वाहनधारकाला रस्त्यावरुन आपले वाहन खाली उतरुन पुन्हा रस्त्यावर घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे वाहनधारकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यासाठी त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.