खानापूर परिसरात जीर्ण झाडे बनली धोकादायक

खानापूर परिसरात जीर्ण झाडे बनली धोकादायक

वटपौर्णिमेदिवशी वडाच्या झाडाची फांदी तर पुन्हा हलकर्णी क्रॉसजवळ फांदी पडली
वार्ताहर/खानापूर
सध्या पावसाळ्याचे दिवस असून वारा व पाऊस सुरू आहे. वाऱ्यामुळे जीर्ण झाडांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणारे पादचारी व वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. जांबोटी-जत रस्त्यावरील खानापूर मलप्रभा क्रीडांगणाजवळील हनुमान मंदिराच्या पाठीमागे असलेल्या वडाच्या झाडाची फांदी वटपौर्णिमेदिवशी रस्त्यावर पडली. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. अथक परिश्रमानंतर जेसीबीने फांदी बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली होती. त्यामुळे दोन तास वाहने थांबून होती. फांदी रस्त्यावर पडल्यामुळे कोणालाही इजा पोहोचली नाही.
परंतु या घटनेमुळे रस्त्यावरील जीर्ण झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  खानापूर-बेळगाव रस्त्यावरील हलकर्णी क्रॉसजवळ गुऊवारी एका जीर्ण झालेल्या झाडाची फांदी पुन्हा रस्त्यालगत कोसळली. नेहमीच या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. परंतु फांदी कोसळली त्यादरम्यान या ठिकाणी कोणी नसल्याने अनर्थ  टळला. मात्र, जीर्ण झाडांच्या फांद्या कोसळत असल्याने वाहनधारकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.तालुक्याच्या मध्यातून जाणाऱ्या खानापूर-तालगुप्पा रस्त्यावर करंबळ क्रॉसपासून लिंगनमठ क्रॉसपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी झाडे आहेत.
ही सर्व झाडे कितीतरी वर्षांपूर्वी लावलेली आहेत. बहुतेक झाडे जीर्ण अवस्थेत आहेत. सदर जीर्ण  झाडे तोडण्याची अनेकवेळा मागणी करण्यात आली. परंतु याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. खानापूर-कणकुंबी, खानापूर-हेम्माडगा, नंदगड-नागरगाळी या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा जीर्ण झालेली अनेक झाडे आहेत. ही झाडे तोडणे गरजेचे आहे. तालुक्याच्या मुख्य केंद्रापासून गावागावांना जोडण्यासाठी रस्ते बनविण्यात आले आहेत. पूर्वी या रस्त्यावरून चालत जाणाऱ्यांची संख्या खूप होती. बदलत्या काळानुसार वाहनांची संख्या वाढल्यामुळे अनेक जण वाहनावरून ये-जा करू लागले. त्यामुळे चालत जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
पूर्वी चालत जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन त्यांना थकवा जाणू नये, सावली मिळावा, ऑक्सिजन मुबलक मिळावा या उद्देशाने झाडे लावण्यात आली होती. शिवाय  बहुतांशी झाडे फळांची होती. त्यामुळे आंबे, फणस हंगामानुसार खायला मिळत होते. त्यामुळे रस्त्यावरून जाणारा प्रवासी याचा आस्वाद घेत होता. मात्र,  काळानुसार परिस्थिती बदलली आहे. ही सावली देणारी रस्त्यावरील झाडे आता जीर्ण झाली आहेत. या झाडांच्या फांद्या पडून एखाद्याच्या जीवाला धोका पोहोचू नये. याचा विचार करून प्रशासनाने वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना जीर्ण झाडांची पाहणी करण्यासाठी सूचना करून आवश्यक जीर्ण झाडे तोडावी अशीच अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.