साफ निती…….

एका जंगलात बरेच प्राणी जमले होते. जंगलाचं रक्षण करून अनेक प्राण्यांचे जीवन या सिंहामुळे वाचले होते. म्हणूनच सगळ्यांनी मिळून सिंहाला एकमताने राजा म्हणून घोषित केलं होतं. सिंह खूष झाला होता, योग्य न्याय मिळाला होता. दिवसभर सगळ्यांच्या भेटीगाठीत गेल्यानंतर रात्री सिंह पाय मोकळे करायला नदीच्या किनारी निघाला. शांतपणे चालत गार वाऱ्याच्या आनंदात पुढे जात होता. जंगलाचा […]

साफ निती…….

एका जंगलात बरेच प्राणी जमले होते. जंगलाचं रक्षण करून अनेक प्राण्यांचे जीवन या सिंहामुळे वाचले होते. म्हणूनच सगळ्यांनी मिळून सिंहाला एकमताने राजा म्हणून घोषित केलं होतं. सिंह खूष झाला होता, योग्य न्याय मिळाला होता. दिवसभर सगळ्यांच्या भेटीगाठीत गेल्यानंतर रात्री सिंह पाय मोकळे करायला नदीच्या किनारी निघाला. शांतपणे चालत गार वाऱ्याच्या आनंदात पुढे जात होता. जंगलाचा भाग संपून आता नदीकिनारी उंच उंच वाढलेल्या गवताच्या भागातून जाऊ लागला. या गवतावर अनेक किडे माशा, डास, नाकतोडे असे हजारो किटक राहत होते. चालणाऱ्याला जाता येता चावत होते. सिंहाला अशाच या गवतात चालतांना या प्राण्यांना तोंड द्यायला लागलं. त्याला खूप राग आला. सारखे डास, किडे त्याला उगीचच चावत होते. त्याला क्षणभर ते नकोसे वाटले आणि त्या रागातच त्यांनी जोरदार डरकाळी फोडली. त्यातले काही घाबरलेले प्राणी पटकन उडून गेले. काही आवाजाच्या डरकाळीने घाबरून खाली पडले. गवताच्या पात्यावर पलीकडे एक मोठा नाकतोडा झोपला होता. तो दचकून जागा झाला आणि त्यांनी आवाज वाढवून ओरडून विचारलं ‘कोण ओरडलं रे एवढ्या जोरात?, माझी झोप मोडली ना!’ इतक्यात त्याच्यासमोर सिंह आला. तो म्हणाला मी सिंह या जंगलाचा राजा ओरडलो, दुसऱ्याला जगूच न देणारी तुझी प्रजा घाबरून पळाली की! आता मात्र नाकतोडा मोठ्याने हसायला लागला, या भागाला ‘सराटी’ म्हणतात. म्हणजे गवताचा भाग आणि ह्या गवतावर राहणारे हजारो कीटक, प्राणी, पक्षी, मला इथल्या गावचा पाटील म्हणजेच राजा मानतात कळलं का! आम्ही सगळे एक झालो की आम्हाला टोळधाड असेही म्हणतात. आमची टोळधाड जिथे जाईल तिथल्या सगळ्या गोष्टींचा नायनाट करते. आम्ही यासाठी प्रसिद्धच आहोत. त्याच्यामुळे  सांगून ठेवतो, माझ्या नादाला लागायचं नाही, आपला नाद करायचा नाही ….ही आमची पाटलांची भाषा लक्षात ठेवायची. आता मात्र सिंहाला हसावं की रडावं, हेच कळेना तो शांतपणे सगळं बघत होता. मुर्खांना काही पटत नाही हेच खरं. या नाकतोड्याच्या पलीकडेच एका गवताच्या पात्यावर बसून टिटवी टीव टीव टीव टीव करत बोलत होती. आपल्या राजाचा सन्मान वाढवत होती. शेवटी मुर्खांच्या नादी लागायला नको म्हणून सिंह शांतपणे वळला. कुठलीही प्रतिक्रिया न देता नदीकडे शांतपणे चालत निघाला. सगळे नाकतोडे पाटलांचा सन्मान करण्यात गुंतले. सिंह इकडे नदीचे थंडगार पाणी पिऊन पाण्यामध्ये डुंबला आणि मग पुन्हा शांतपणे नदीच्या बाहेर आला. पण आता हवा बदलली होती. जोरदार वादळी वारे वहायला सुरुवात झाली होती. जंगलातली जुनी वाळलेली झाडं कडाकड आवाज करत उन्मळून पडत होती. मोठ मोठ्या झाडांच्या पानांची सळसळ अगदी मोठ्याने ऐकू येत होती. इकडे सराटी भागातले गवत एकमेकांच्यामध्ये पात्यात पाती अडकून जमिनीलगत पूर्ण आडवं होऊन कोलमडून पडलं होतं. रात किड्यांचे आवाज थांबले होते. टिटवी मात्र आता कुठेतरी दुसऱ्यांच्या आश्रयाला जाऊन टिवटिव करतच होती. फक्त नाकतोडे मात्र दिसेनासे झाले होते. सिंहाने इकडे तिकडे बघण्याचा प्रयत्न केला. इतक्यात त्याला जमिनीवर पडलेल्या गवतात बऱ्याच ठिकाणी कोळ्यांची जाळी लागलेली दिसली होती आणि ह्या जाळ्यांमध्ये हा नाकतोडा अडकून पडला होता. त्याला काही केल्या बाहेर येता येत नव्हतं. बिचारा आऊटघटकेचा राजा असल्यासारखा हा सराटीतला राजा कुठल्या कुठे हेलपाटत जाऊन पडला होता. त्याचा एकही भाऊबंद मदतीला आला नव्हता. ज्याला स्वत:च रक्षण करता येत नाही, स्वत:चे घरदार चालवता येत नाही, तो मात्र सगळ्यांचा पुढारी किंवा नेता म्हणून हिंडत असतो, हेच खरं. असे नग आपल्यालाही आपल्या आसपास या युगात यथातथा आढळतातच. सिंहाने क्षणभर त्याच्याकडे पाहिले अन् पाहून न पाहिल्यासारखे करत शांतपणे पुन्हा तो जंगलाची वाट चालू लागला. आपल्या ताकदीची कल्पना नसताना वरचढ होण्याचा प्रयत्न करु नये, आपल्यापेक्षा कमकुवत माणसं किंवा प्राणी आपल्या शेवटास कारणीभूत ठरतात.