सावधान, अफगाणिस्तान संघ धोकादायक ठरू पाहतोय!

ही स्पर्धा सुरू होण्याअगोदर या स्पर्धेवर कोण प्रभुत्व दाखवणार? किंबहुना ग्रुप स्टेजच्या लढतीत काही उलटफेर तर होणार नाही ना? असे नाना प्रश्न क्रिकेट रसिकांना पडले होते. अर्थात त्याची उत्तरे आता हळुहळू मिळू लागलीत. सर्वप्रथम अमेरिकेने पाकिस्तानला दुखावलं. स्पर्धेच्या सुऊवातीलाच पाकिस्तानचा प्रेमभंग झाला. अर्थात याला कारणीभूत कोण? कोण म्हणतील अमेरिका संघातील भारतीय वंशाचे खेळाडू, काही जण […]

सावधान, अफगाणिस्तान संघ धोकादायक ठरू पाहतोय!

ही स्पर्धा सुरू होण्याअगोदर या स्पर्धेवर कोण प्रभुत्व दाखवणार? किंबहुना ग्रुप स्टेजच्या लढतीत काही उलटफेर तर होणार नाही ना? असे नाना प्रश्न क्रिकेट रसिकांना पडले होते. अर्थात त्याची उत्तरे आता हळुहळू मिळू लागलीत. सर्वप्रथम अमेरिकेने पाकिस्तानला दुखावलं. स्पर्धेच्या सुऊवातीलाच पाकिस्तानचा प्रेमभंग झाला. अर्थात याला कारणीभूत कोण? कोण म्हणतील अमेरिका संघातील भारतीय वंशाचे खेळाडू, काही जण खेळपट्टीच्या नावाने नाक मुरडतील. दुसरीकडे अफगाणिस्तानने ‘किवी’ला धूळ चारली. आणि आम्ही आता चिल्लर राहिलेलो नाही, हे त्यांनी स्पर्धेच्या पूर्वार्धालाच स्पष्ट केलं. त्यातच काल बांगलादेशने श्रीलंकेला हरवत आम्ही सर्वजण छोटा पॅकेट, बडा धमाका आहोत हे सिद्ध केलं. मला अफगाणिस्तान संघाचे कौतुक करावंसं वाटतं. चिल्लर समजल्या जाणाऱ्या संघाकडून ज्यावेळी एखाद्या पराभवास सामोरे जावे लागते, त्यावेळी एखाद्या संघाची मनस्थिती काय होते ते तुम्ही भारत, पाकिस्तान आणि इंग्लंडला विचारा. या सर्व गोष्टींचे उत्तर अचूक शब्दात देतील.
मला अफगाणिस्तान संघाचा प्रचंड हेवा वाटतो. त्यांची दिवसेंदिवस कामगिरी कमालीची उंचावते. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी इंग्लंड व पाकिस्तानला हरवलं. नव्हे त्यांचं कंबरडंच मोडलं. क्रिकेटचे बालपण संपवून आम्ही ताऊण्यात पदार्पण केले आहे, हे त्यांनी मागच्या विश्वचषक स्पर्धेत दाखवून दिले. काही महिन्यापूर्वी अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला होता. त्या विचित्र मानसिकतेतून ते भारतात आले आणि बघता बघता ते भारत काबीज करणार असे वाटत असताना ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल उभा ठाकला. अन्यथा जो चित्रपट त्यांच्यासाठी पूर्ण स्पर्धेत रंगीत ठरू पाहत होता तो त्यांच्यासाठी अखेर ब्लॅक अँड व्हाईट ठरला. 2024 मधील विश्वचषक स्पर्धा ही ब्लॅक अँड व्हाईट नसून रंगीतच आहे हे आता अफगाणिस्तानला सिद्ध करायचे आहे. क्रिकेटच्या बॉक्स ऑफिसवर त्यांना आता मोठ्या प्रमाणात गल्ला हा जमावाच लागेल.
अमेरिका, बांगलादेश, अफगाणिस्तान या संघाकडे गमावण्यासारखं काहीच नसते. परंतु स्पर्धेच्या महत्त्वाच्या क्षणी ज्यावेळी ते दिग्गज संघांना पराभूत करतात त्यावेळी तो संघ अक्षरश: रस्त्यावर येतो. हे आपण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा पाहिले आहे. टी-20 सारख्या छोट्या फॉरमॅटमध्ये ज्यावेळी एक चूक जसे सामन्याचे चित्र पालटू शकते अगदी तसंच नवख्या संघाकडून एक पराभव होत्याचं नव्हतं किंवा लाखाचे खाक करण्यास पुरेसे असतात. अफगाणिस्तान संघ आता विश्वचषक स्पर्धेत ‘अपक्ष’ राहिलेला नाहीये. तो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त होऊ पाहतोय. याच अफगाणिस्तान संघाने चालू विश्वचषक स्पर्धेत आणखी काही धक्के दिलेत तर नवल वाटून घेऊ नका. किंबहुना आता दिग्गज संघाने त्याची सवय करून घेतली पाहिजे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत मजबूत पाया रचला आहे. आता मात्र या विश्वचषक स्पर्धेत मोठ मोठे पिलर त्यांना उभे करावेच लागतील. जाता जाता एवढंच म्हणावसं वाटतं जसं राजकारणात ए फॉर अमेठीला जसं महत्त्व आहे, अगदी तसंच क्रिकेटमध्ये ए फॉर अफगाणिस्तानला जर महत्त्व आलं तर कोणी नवल वाटून घेऊ नये.