संसार मिथ्या असल्याने बंध वा मुक्ती हा भ्रम होय

अध्याय तिसावा दारूकाला भगवंत आपल्याला बरोबर न घेताच निजधामाला जात आहेत हे पाहून फार वाईट वाटले. भगवंतांच्या सहवासाचा मोह आणि त्यांच्या होणाऱ्या वियोगाचे दु:ख ह्यांनी तो शोकाकुल झाला होता. त्याचे कायमचे कल्याण व्हावे म्हणून देवांनी त्याला सांगितले की, त्यांच्या हृदयात अढळ स्थान मिळवण्यासाठी, देहाभिमान नष्ट होणे आवश्यक आहे. त्यासाठी जो त्यांच्या भजनपूजनात आणि नामस्मरणात दंग […]

संसार मिथ्या असल्याने बंध वा मुक्ती हा भ्रम होय

अध्याय तिसावा
दारूकाला भगवंत आपल्याला बरोबर न घेताच निजधामाला जात आहेत हे पाहून फार वाईट वाटले. भगवंतांच्या सहवासाचा मोह आणि त्यांच्या होणाऱ्या वियोगाचे दु:ख ह्यांनी तो शोकाकुल झाला होता. त्याचे कायमचे कल्याण व्हावे म्हणून देवांनी त्याला सांगितले की, त्यांच्या हृदयात अढळ स्थान मिळवण्यासाठी, देहाभिमान नष्ट होणे आवश्यक आहे. त्यासाठी जो त्यांच्या भजनपूजनात आणि नामस्मरणात दंग राहील त्याचा देहाभिमान विनासायास, कोणताही खर्च न करता, अगदी घरबसल्या नाहीसा होईल.
हरी भक्तिचा भुकेला असतो. जो भगवंतांची अनन्य भक्ती करेल त्याच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था भगवंत स्वत: करतात आणि शेवटी आत्यंतिक क्षेम म्हणजे त्याचे सर्वोच्च कल्याण साधून देतात. त्याला संसार सागरातून बाहेर काढून, त्याचा मृत्यू चुकवून, त्याला निजधामाला घेऊन जातात. भगवंत पुढे म्हणाले, भक्ताचा देहाभिमान नाहीसा झाला की, त्याच्या अपेक्षा आपोआपच संपुष्टात येतात आणि निरपेक्षता अलगदपणे त्याच्या मनावर ठसते. भक्ताला निरपेक्षता प्राप्त झाली की, त्याला विषय कितीही भरीला घालत असले तरी त्यांची इंद्रिये त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाहीत कारण निरपेक्षता हाती आलेला भक्त सभोवार दिसणारे चराचर विश्व समूळ मिथ्या आहे हे जाणून असतो. ज्याप्रमाणे अंधारात पडलेला दोराच्या जागी साप आहे असे वाटते. त्याप्रमाणे मिथ्या असलेला संसार खरा आहे असा भास होतो. अंधारात ज्याला मनुष्य साप समजतो त्याला प्रत्यक्ष उजेडात बघितलं तर तो केवळ दोर असतो पण हे लक्षात येईपर्यंत भासणारा साप पांढरा आहे, काळा आहे की लाल आहे ह्याबद्दल चर्चा होत राहते. त्याप्रमाणे मिथ्या संसारातील अस्तित्व नसलेल्या विषयावर, त्यातून मिळणाऱ्या सुखावर लोक चर्चा करत असतात. समुद्रात असलेला शिंपला त्याच्यावर उजेड पडला की, चांदीसारखा चमकत असतो आणि लोक तो चांदीचा आहे असे समजून त्यापासून कोणकोणते दागिने करता येतील ह्याबद्दल चर्चा करत असतात पण प्रत्यक्षात तो शिंपला चांदीचा नसून चांदीचा असल्याप्रमाणे भासत असल्याने त्याचे कोणकोणते आणि कसे दागिने घडवावेत ह्याबद्दल लोकांच्यात चर्चा रंगते पण मुळातच तो शिंपला चांदीचा नसल्याने त्या चर्चेला काही अर्थच नसतो, त्याप्रमाणे समोर दिसणारे जग नश्वर असल्याने खोटेच असते मग त्यापासून निर्माण होणारे बंध आणि मोक्ष हेही खोटेच होत. त्यामुळे त्यावरील चर्चाही व्यर्थच ठरतात. तसेच काही लोक आम्ही सज्ञान असून संसारातून मुक्त झालो असल्याने आम्ही भवबंधनाचा नाश केलेला आहे असे म्हणतात तेही भ्रमातच असतात. संसार ही मायेची रचना आहे हे समजून घेणे हे ज्ञान आहे आणि ती वस्तुस्थिती पचवून त्यावर ठाम राहणे ह्याला विज्ञान म्हणतात. हे मनावर ठसवण्यासाठी जी वस्तू कायम टिकणारी असते ती सत्य असते. तर जी वस्तू कधी ना कधी नाश पावणारी असते ती असत्य असते ह्या वस्तुस्थितीचा स्वीकार करण्याची मनाची तयारी झाली की, जरी संसार नजरेला दिसत असला तरी तो नश्वर असल्याने खोटा आहे हे मुद्दामहून लक्षात ठेवावे लागत नाही. अशा मनाच्या अवस्थेत, संसाराशी संबंधित बंध, मोक्ष, मुक्ती ह्या कल्पनाही आपोआपच मोडीत निघतात. हे एकदा अंगवळणी पडले की, संसाराशी संबंधित गोष्टीवर मनात विचार येण्याचे थांबते. ह्याला मनाचा मनपणा नाहीसा होणे असे म्हणतात. समोर दिसणाऱ्या संसाराचे अस्तित्वच नाही म्हंटलं की, त्याचे बंधन किंवा त्यापासून मुक्ती हा विषयच उपस्थित होत नाही. तसेच माणसाने जागृती सुषुप्ती आणि स्वप्न ह्याचे मिथ्यत्व संसार मिथ्या आहे ह्या सत्यावर जाणून घ्यावे आणि मनावर ठसवावे.
क्रमश: