कुलगाम चकमकीत लष्करी जवान हुतात्मा

कुलगाम चकमकीत लष्करी जवान हुतात्मा

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे कारनामे सुरूच
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे कारनामे सुरूच आहेत. शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला आहे. शनिवारी दुपारपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. दहशतवाद्यांच्या गोळीने जखमी झालेल्या जवानाला ऊग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत दहशतवादी लपलेल्या भागात शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली होती. तसेच अतिरिक्त फौजफाटाही मागविण्यात आला होता.
कुलगामच्या मुद्राघममध्ये किमान 2 ते 3 दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्याविरोधात संयुक्त मोहीम उघडली होती. यावेळी झालेल्या गोळीबारात एका जवानाला प्राण गमवावे लागले. शनिवारी दुपारपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. सुरुवातीला दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, त्यांनी शरणागती न पत्करता गोळीबार सुरू केल्याने संघर्षाची स्थिती निर्माण झाली. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे जवान ही संयुक्त मोहीम करत आहेत.
गेल्या काही दिवसात राज्यात दहशतवाद्यांच्या कुरापती वाढल्या आहेत. मागील एका महिन्यात सुरक्षा दलांनी 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये डोडा येथे 11-12 जून रोजी सलग दोन दिवस दोन हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांचा आणि उरीमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा समावेश आहे.