पुणे : यंदा भाताचा उतारा घटला; तांदूळ महागणार!
सुषमा नेहरकर शिंदे
पुणे : खरीप हंगामात सुरुवातीलाच पावसाने दडी दिल्याने भातलागवड उशिरा झाली आणि भात फुलोर्यात असतानाही पावसाने पाठ फिरवल्याने भाताच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. भातउतारा घटल्याने शेतकरी अडचणीत आला असून, त्यांचा खर्चदेखील निघाला नाही; परंतु यामुळे यंदा तांदळाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यातील भाताचे आगर म्हणून जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुका ओळखला जातो. खरीप हंगामात या तिन्ही तालुक्यांतील आदिवासी शेतकरी 100 टक्के फक्त भात शेतीच करतात; परंतु हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दडी दिल्याने भात आवणीला तब्बल एक ते दीड महिना उशीर झाला. त्यानंतर झालेल्या चांगल्या पावसामुळे भात पीक जोमात होते. परंतु भात फुलोर्यात असताना भाताच्या ओंब्या भरण्यासाठी पुन्हा पावसाची आवश्यकता असते, पण या वेळीदेखील अपेक्षित पाऊस झाला नाही.
यामुळे भाताला ओंब्या येऊनही भरल्या नाही. सध्या जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यात भातकाढणी सुरू असून, भाताचा उतारा खूपच कमी येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. भाताचे बी, लावणी व काढणीच्या खर्चात गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. त्यात भाताचे उत्पादन घटल्याने भात उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
भाताचे क्षेत्रही आणि आता उत्पादनदेखील घटले
जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांत भाताचे सरासरी 23 हजार 687 हेक्टर असून, पाऊस कमी व उशिरा झाल्याने खरीप हंगामात 16 हजार 780 हेक्टर म्हणजे 70 टक्केच क्षेत्रावर भाताची लागवड झाली होती. त्यानंतरदेखील पाऊस कमी झाल्याने भाताच्या ओंब्या भरल्या नाहीत. भातामध्ये पळाज जास्त झाल्याने उत्पादनात 20 ते 30 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. यंदा भाताचे क्षेत्र आणि उत्पादनातदेखील घट झाली आहे.
भारतात ज्या राज्यात प्रामुख्याने भात पीक घेतले जाते, तिथे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भात पिकावर परिणाम झाला आहे. मागणी वाढत असताना पीक कमी आले तर दरामध्ये वाढ होतेच. यंदा सर्वच तांदळांचे दर 15 ते 20 टक्क्यांनी वाढणार आहेत.
राजेश शहा, तांदळाचे व्यापारी, पुणे.
या वर्षी सुरुवातीपासूनच पाऊस अवेळी झाला. भाताचे रोप टाकण्यासाठी उशीर झाला, भातलागवडीला उशीर झाला. याचा परिणाम भाताच्या पिकावर झाला आहे. मध्यंतरी झालेल्या चांगल्या पावसाने पीक जोमात आले होते, पण जेव्हा आवश्यक होता तेव्हा पावसाने पुन्हा दडी दिल्याने यंदा भात उत्पादनात घट झाली आहे.
रामदास लांडगे,
शेतकरी, दरकवाडी, ता. खेड
हेही वाचा
Maratha Resevration : छगन भुजबळांचा प्रतिकात्मक पुतळा जाळुन निषेध व्यक्त
Sugarcane Andolan : कोल्हापुरात ऊसदर आंदोलन तीव्र; स्वाभिमानीचा चक्काजाम
Dhangar Reservation : ओबीसी नेत्यांची बेताल वक्तव्ये; पुरंदर तालुका अस्वस्थ
The post पुणे : यंदा भाताचा उतारा घटला; तांदूळ महागणार! appeared first on पुढारी.
पुणे : खरीप हंगामात सुरुवातीलाच पावसाने दडी दिल्याने भातलागवड उशिरा झाली आणि भात फुलोर्यात असतानाही पावसाने पाठ फिरवल्याने भाताच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. भातउतारा घटल्याने शेतकरी अडचणीत आला असून, त्यांचा खर्चदेखील निघाला नाही; परंतु यामुळे यंदा तांदळाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील भाताचे आगर म्हणून जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुका ओळखला …
The post पुणे : यंदा भाताचा उतारा घटला; तांदूळ महागणार! appeared first on पुढारी.