पुणे : इच्छुकांची देवदिवाळी
पुणे : पुढारी वृत्तसेवा : निमित्त दिवाळी फराळाचे… उद्देश मात्र राजकीय मोर्चेबांधणीचा! पुण्यात ‘दिवाळी पहाट’निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. सर्व सभागृहे, सारसबागेसारखी उद्याने या कार्यक्रमांनी भरून गेली. त्याच पद्धतीने राजकीय कार्यकर्त्यांनी ‘दिवाळी फराळ’ कार्यक्रम आयोजित केले आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष गेल्या वर्षभरात फुटले. काहींना नवे मित्र मिळाले, मात्र जुन्यांमध्ये तट पडले. काही नवे मित्र नाराज झाल्याचेही जाणवले. दिवाळीनिमित्त या सर्वांना एकत्र आणण्याचे निमित्त ठरले ते दिवाळी फराळांच्या कार्यक्रमांचे. दरवर्षींचे असे कार्यक्रम होत असले, तरी यावेळच्या कार्यक्रमांना जोड मिळाली ती आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीची. सर्वच मित्रांना एकत्र आणण्याच्या उद्देशांनी आयोजक नेत्यांनी शक्कल योजली, ती सर्वपक्षीय दिवाळी फराळाची. त्यामुळे सर्वच पक्षाचे स्थानिक नेते, कार्यकर्ते या निमित्ताचे एकत्र जमले.
मंत्री, खासदार, आमदार, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्यासह माजी नगरसेवक, निवडणुकींना इच्छुक असणारे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीने हे कार्यक्रम रंगले. राजकीय आडाखे, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बदलणार्या भूमिका यांचीही चर्चा कार्यकर्त्यांत रंगली. सर्व पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आल्याने शहरात राजकीय दृष्टीने निकोप वातावरण निर्माण होण्यास मदत
झाली. त्याचबरोबर पक्षफुटीने एकमेकांपासून दूर गेलेले कार्यकर्तेही त्यानिमित्त एकमेकांना भेटले.
कार्यकर्त्यांना लोकसभा, विधानसभा निवडणुकांपेक्षाची महापालिकेच्या निवडणुकीत काय होणार, या चिंतेने पछाडले आहे. त्यामुळे, आरक्षणाच्या आंदोलनापासून ते आमदारांच्याबाबत होणार्या निकालाबाबत आपापले अंदाज व्यक्त करीत दिवाळीनिमित्त एकप्रकारे राजकीय आतषबाजीच कार्यकर्ते करीत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय दिवाळी फराळ कार्यक्रमाला शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, खासदार वंदना चव्हाण, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील टिंगरे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सर्व पक्षाचे माजी नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांत उत्साही वातावरण होते.
शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदा आयोजिलेल्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाला त्यांच्याच मतदारसंघातील मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. या वेळी मोकाटे यांनी पक्षाने संधी दिल्यास आगामी विधानसभेची निवडणूक कोथरूड मतदारसंघातून लढविण्याची तयारी जाहीरपणे व्यक्त केली.
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेनेचे (ठाकरे गट) शहराध्यक्ष संजय मोरे, रिपब्लिकन पक्षाचे अॅड. मंदार जोशी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनीही दिवाळी फराळानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते.
काही नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात असे कार्यक्रम घेतले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनीही असा कार्यक्रम लवकरच घेणार असल्याचे सांगितले. दिवाळी फराळाच्या निमित्ताने येत्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. कोणत्याही पक्षाचे सक्षम उमेदवार अद्याप निश्चित झाले नाहीत. तसेच, राजकीय बेरजा-वजाबाक्या कशा होणार याचेही अंदाज या वेळी बांधण्याचे काम कार्यकर्ते करीत होते.
या निवडणुकीनंतर किंवा त्याबरोबरच विधानसभेची निवडणूक होणार का, याचीही चर्चा या वेळी सुरू होती. त्यामुळे दिवाळी फराळाच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी पुढील वर्षांत रंगणा-या निवडणुकांतील आतषबाजीचीच चर्चा सर्वत्र रंगली असल्याचे जाणवले.
हेही वाचा
Maratha Reservation : मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात बैठक
Maratha Reservation : प्रमाणपत्रासंबंधी समिती पुणे दौर्यावर येणार
समन्यायी पाणी वाटप; डॉ. विखे कारखान्याकडून याचिका दाखल
The post पुणे : इच्छुकांची देवदिवाळी appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : निमित्त दिवाळी फराळाचे… उद्देश मात्र राजकीय मोर्चेबांधणीचा! पुण्यात ‘दिवाळी पहाट’निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. सर्व सभागृहे, सारसबागेसारखी उद्याने या कार्यक्रमांनी भरून गेली. त्याच पद्धतीने राजकीय कार्यकर्त्यांनी ‘दिवाळी फराळ’ कार्यक्रम आयोजित केले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष गेल्या वर्षभरात फुटले. काहींना नवे मित्र मिळाले, मात्र जुन्यांमध्ये तट पडले. …
The post पुणे : इच्छुकांची देवदिवाळी appeared first on पुढारी.