Pune Crime News : शिक्षिकेचे अपहरण अन् सुटकेचा थरार
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातून एका शिक्षिकेचे इंजेक्शन देऊन फिल्मी स्टाईलने अपहरण करण्यात आले. एका गाडीत डांबून तिला थेट गुजरातमध्ये नेण्यात आले. नैसर्गिक विधीच्या बहाण्याने शिक्षिकेने एका जंगलाच्या कडेला गाडी थांबविण्यास भाग पाडले. याचवेळी पायाला बांधलेली दोरी सैल झाली आणि त्याच संधीचा फायदा घेत तिने अपहरण करणार्या टोळीच्या तावडीतून सुटका करून घेत पळ काढला. पुढे रस्त्यावर भेटलेल्या नागरिकांच्या मदतीने ही सर्व कैफियत तिने गुजरात पोलिसांच्या कानावर घातली.
गुजरात पोलिसांच्या मदतीने ती तरुणी सुखरूप आपल्या पुण्यातील घरी पोहचली आहे. याप्रकरणी पाच अनोळखी व्यक्तींसह आरा नावाच्या महिलेवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही टिंगरेनगर येथील एका शाळेत शिक्षिका आहे. ती मगरपट्टा येथील एका खासगी कंपनीतही नोकरी करते. 5 नोव्हेंबरला पक्ष्यांच्या खाद्याच्या दुकानातून खाद्य खरेदी करून पुन्हा दुचाकीवरून घरी जात असताना 509 चौक ओलांडून कारागृहाकडे जाणार्या एअरपोर्ट रोडने रिक्षामधून तसेच कारमधून आलेल्या तिघांनी तिचे अपहरण केले. त्यांनी तिच्या तोंडाला आणि डोळ्यावर कापड बांधले.
इंजेक्शन देऊन केले बेशुध्द
कारमधून अपहरण केल्यानंतर त्यांनी तिला बेशुध्द करण्याचे इंजेक्शन दिले. त्यानंतर तिला काही समजले नाही. तिला जशी जाग येई तसे इंजेक्शन दिले जात होते. त्यानंतर तिने स्वतःला एका खोलीमध्ये असल्याचे पाहिले. याच दरम्यान त्या खोलीमध्ये एक खूप मेकअप केलेली महिला आली. तिने तरुणीला ’तेरेको भी ऐसाच रहना होगा, दुसरी जगह तेरा सौदा करनेवाले है’, असे म्हणून तिने इतर मुलांना हिला संभाळून घेऊन जाण्यास सांगितले. तिला नेत असताना गाडीमध्ये दुसर्या दोन मुली होत्या. त्या मुलींचेदेखील हातपाय व तोंड बांधलेले होते. तसेच कारमध्ये तीनजण बसले होते. दरम्यान गाडी एका ठिकाणी थांबल्यानंतर त्या तरुणीला गाडीच्या बाहेर काढून गाडीतील एका मुलाने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या मुलाला इतर लोकांनी मारले, तसेच त्याला हाकलून दिले. पुढच्या स्टॉपला एक मुलगा गाडीत चढला. पुढे रात्र व दिवस होत होते, तरी तिला काही समजत नव्हते.
अशी करून घेतली सुटका
रात्रंदिवस प्रवास करत असताना दुपारच्या वेळी तरुणीला नैसर्गिक विधीसाठी जायचे असल्याने कारमधील एकजण तिला पाय बांधलेल्या अवस्थेत जंगलात घेऊन गेला. तेथूनच तिने बांधलेले पाय सोडून पळ काढला. तब्बल पाच ते सहा तास जंगलात ती लपून राहिली. संध्याकाळी सहाच्या सुमारास ती जंगलाबाहेरील रस्त्यावर आली. तेथे तिने मदत मागितली. परंतु, तिला सुरुवातीला मदत मिळाली नाही. नंतर दुचाकीवरील दोघे तिच्या मदतीसाठी धावून आले. तेथून त्या मुलांनी पोलिसांना फोन केला. त्या वेळी पोलिस तेथे आले. पोलिसांना हकीकत सांगितल्यानंतर तरुणीने पोलिसांच्या फोनवरून तिच्या वडिलांना फोन लावला.
याप्रकरणात येरवडा पोलिस ठाण्यात 5 नोव्हेंबरला तरुणीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपली सुटका करून घेतल्यानंतर तिने गुजरात पोलिसांच्या मदतीने घरच्यांशी व पुणे पोलिसांशी संपर्क साधला. येरवडा पोलिसांकडून हा गुन्हा आमच्या पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान तरुणीचा जबाब नोंदविण्यात आला असून, घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
– आर. व्ही. वारंगुळे, पोलिस उपनिरीक्षक, विमानतळ पोलिस ठाणे.
हेही वाचा
मराठा-धनगर आरक्षणासंदर्भात ठाकरे शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार
Pune News : पुढील वर्षापासून पदव्युत्तर पदवी एक वर्षाची
अमेरिकेत महिलेच्या पोटात दोन गर्भाशये, दोन बाळं!
The post Pune Crime News : शिक्षिकेचे अपहरण अन् सुटकेचा थरार appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातून एका शिक्षिकेचे इंजेक्शन देऊन फिल्मी स्टाईलने अपहरण करण्यात आले. एका गाडीत डांबून तिला थेट गुजरातमध्ये नेण्यात आले. नैसर्गिक विधीच्या बहाण्याने शिक्षिकेने एका जंगलाच्या कडेला गाडी थांबविण्यास भाग पाडले. याचवेळी पायाला बांधलेली दोरी सैल झाली आणि त्याच संधीचा फायदा घेत तिने अपहरण करणार्या टोळीच्या तावडीतून सुटका करून घेत पळ काढला. …
The post Pune Crime News : शिक्षिकेचे अपहरण अन् सुटकेचा थरार appeared first on पुढारी.