जरांगे-पाटलांची सातारा, मेढा, वाई येथे आज सभा
सातारा; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी (दि. 18) सकाळी 10 वाजता मराठ्यांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक सातारा शहरातील गांधी मैदान येथे सभा होणार आहे. त्यानंतर मेढ्यात बाजार चौक तर वाईतील छ. शिवाजी महाराज चौकात सभेतूनही त्यांची तोफ धडाडणार आहे. सातार्यातील सभेनंतर जरांगे-पाटील हे दोन्ही राजांच्या निवासस्थानी भेट देऊन मराठा आरक्षणाबाबत चर्चा करणार आहेत.
अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी बेमुदत उपोषण केले. यानंतर सरकारला जाग आल्यानंतर त्यांनी कुणबी दाखल्यांच्या नोंदी तपासण्याचे काम प्रत्येक जिल्ह्यात सुरू केले आहे. तसेच काही ठिकाणी दाखले वाटपही सुरू झाले आहे. पण सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले मिळावेत यासाठी जरांगे-पाटलांनी सरकारला दि. 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे- पाटील यांनी पुन्हा महाराष्ट्रभर दौरे सुरू करून मराठा समाजात जागृती करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा पश्चिम महाराष्ट्रात तिसर्या टप्प्यातील दौरा सुरू झाला आहे. दि. 15 नोव्हेंबर पासून ते 23 नोव्हेंबरपर्यंत हा तिसरा टप्पा सुरू राहणार आहे.
तिसर्या टप्प्यातील शनिवार दि. 18 नोव्हेंबर रोजी मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा शहरात जरांगे पाटील गरजणार आहेत. शनिवारी सकाळी शिवतीर्थ पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून गांधी मैदान येथील सभेतून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. सभा संपल्यानंतर ते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची जलमंदिर तर आ. शिवेंद्रराजे भोसले यांची सुरूची येथील निवासस्थानी भेट घेवून मराठा आरक्षणाबाबत चर्चा करून आपल्या भावना व्यक्त करणार आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांची मेढा येथील बाजार चौक तर वाईतील छ. शिवाजी महाराज चौकात सभा होणार आहेत. या सभेबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी तयारी केली आहे. जिल्ह्यातील सभा ऐतिहासिक व्हाव्यात म्हणून गाव, तालुका व जिल्हा पातळीवर बैठका घेण्यात आल्या असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.
सभेपूर्वी शिवतीर्थावर अभिवादन…
बॉम्बे रेस्टॉरंट येथे मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा क्रांती मोर्चा राजधानीच्या वतीने स्वागत होणार आहे. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाचे सुरू असलेल्या साखळी उपोषणास भेट देणार आहेत. त्यानंतर पोवई नाका शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ते सभास्थळी दाखल होणार आहेत.
The post जरांगे-पाटलांची सातारा, मेढा, वाई येथे आज सभा appeared first on पुढारी.
सातारा; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी (दि. 18) सकाळी 10 वाजता मराठ्यांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक सातारा शहरातील गांधी मैदान येथे सभा होणार आहे. त्यानंतर मेढ्यात बाजार चौक तर वाईतील छ. शिवाजी महाराज चौकात सभेतूनही त्यांची तोफ धडाडणार आहे. सातार्यातील सभेनंतर जरांगे-पाटील …
The post जरांगे-पाटलांची सातारा, मेढा, वाई येथे आज सभा appeared first on पुढारी.