वाहने अडविण्याचा प्रयत्न केला तर फडणवीसांच्या दारात बसू!
जालना, Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबईचा दौरा रद्द होणारच नाही. 20 जानेवारीपर्यंत मुंबईच्या दिशेने मोर्चा निघणार आहे. मुंबईतील सर्व मैदाने आम्हाला लागणार असून, सरकारने आमची वाहने अडवली तर आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारात बसू, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात जरांगे हे मुंबईत बेमुदत उपोषण करणार आहेत. आंदोलनासाठी मुंबईच्या आझाद मैदानाची पाहणी जरांगे यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. यावेळी जरांगे यांनी राज्यातील मराठा बांधवांना आंदोलनस्थळी येऊन मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलक 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता मुंबईच्या दिशेने अंतरवाली सराटी येथून कूच करणार आहेत.
लाखो मराठे मुंबईत येणार आहेत. आमची वाहने अडवली तर आम्ही आमचे सामान कशातून नेणार? आम्हाला मुंबईत राहण्यासाठी निवारा, दैनंदिन जीवनाच्या गोष्टी लागणार आहेत. त्यासाठी ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन मुंबईला येणार आहोत. त्यामुळे सरकार आपल्यावर कारवाई करेल, वाहने जप्त करेल, याबद्दल मराठ्यांनी घाबरू नये, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.
मनोज जरांगे म्हणाले…
* आंदोलकांना मोठ्या संख्येने मैदानांची आवश्यकता भासणार
* कोणत्याही परिस्थितीत मुंबईतील आंदोलनाचा निर्णय रद्द करणार नाही
* मुंबईत तीन कोटींहून अधिक मराठा आंदोलक येतील
* सरकारची जबाबदारी आहे, त्यांनी आम्हाला मैदाने द्यावीत
Latest Marathi News वाहने अडविण्याचा प्रयत्न केला तर फडणवीसांच्या दारात बसू! Brought to You By : Bharat Live News Media.