Nagar : खिळखिळी बस अन् विद्यार्थ्यांना मनस्ताप !

सिद्धटेक : Bharat Live News Media वृत्तसेवा : सहलीला जाणार्या विद्यार्थ्यांसाठी आगारप्रमुखांनी चांगली एसटी बस देण्याचा शब्द दिला खरा. मात्र, सहलीच्या दिवशी अत्यंत खिळखिळी अवस्था झालेली बस विद्यार्थ्यांसमोर उभी राहिली. त्यामुळे ऐनवेळी या बसमधूनच प्रवास करण्यावाचून पर्याय नसल्याने नाईलाजाने विद्यार्थी व शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागला. हिवाळा सुरु झाला की, शाळा व विद्यार्थ्यांना सहलीचे वेध लागतात. यामध्ये खरी कसरत असते ती सहलप्रमुख शिक्षकांची! कारण त्यांना प्रवासाचा मार्ग, सहलीची फी, मुक्कामाचे ठिकाण, नाश्ता-जेवण, तसेच सहलीसाठी बस ठरविणे, ही सर्व प्रक्रिया पार पाडावी लागते. यामध्ये प्रामुख्याने शासकीय नियमांचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणात शाळा एसटी बसला प्राधान्य देतात.
हे करत असताना चांगली बस व अनुभवी चालकाची मागणी शाळा आगारप्रमुखांकडे करतात. व्यावसायिक दृष्टिकोन असणारे आगारप्रमुख ही मागणी योग्य प्रकारे पूर्ण करतात. परंतु, याच्या उलट श्रीगोंदा आगारप्रमुखांचा अनुभव कर्जत तालुक्यातील दुधोडी येथील स्व. सुधाकर दत्तात्रय सुपेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक व सहलप्रमुख शिक्षकांना आला. कोल्हापूर दर्शन या सहलीसाठी बस बुक करण्यासाठी सुपेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामराव भोसले हे सहकार्यांसमवेत श्रीगोंदा तालुका आगार प्रमुख होले यांना भेटले. त्यावेळी त्यांनी नवीन आलेल्या बसमधील चांगल्या कंडीशनची बस देण्याचा शब्द दिला होता. परंतु, सहलीच्या दिवशी मात्र अत्यंत खिळखिळी अवस्था झालेली बस विद्यार्थ्यांसमोर येऊन उभी राहिली. आता, ऐनवेळी करायचे काय, असा प्रश्न सर्वांना पडला. त्यामुळे याच बसमधून जाण्यावाचून पर्याय नसल्याने नाईलाजाने सहलीचा प्रवास सुरू झाला.
यावेळी चालक व वाहकाजवळील दरवाजाची झालेली दयनीय अवस्था, इंजिनासमोरील बहुतांश भाग खिळखिळा झालेला, तुटलेली व हलती बाकडे, उचकटलेला-तुटलेला पत्रा, बसचा मंदावलेला वेग, कर्णकर्कश येणारा सततचा आवाज, यामुळे विद्यार्थांना ‘तोंड दाबून बुक्यांचा मार’ सहन करावा लागत होता. एकीकडे शासन एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी वेगवेगळ्या योजना व सवलती जाहीर करत आहे. त्यात शालेय सहली हा एक हक्काचा उत्पन्नाचा भाग आहे. त्यांना पैसे भरून अशी सुविधा मिळत असले तर, भविष्यात शाळांनी सहलीसाठी खासगी बसचा पर्याय निवडला, तर आश्चर्य वाटायला नको.
कारवाईची मागणी करणार
आगारप्रमुख होले यांना वारंवार विनंती करूनही त्यांनी मुद्दाम धोकादायक बस सहलीसाठी दिली. त्यामुळे काही स्थळांना भेटी देणे शक्य झाले नाही. बसची दयनीय अवस्था व कर्णकर्कश आवाजामुळे विद्यार्थ्यांची पुरेशी झोप झाली नाही. त्यांना सहलीचा आनंद घेता आला नाही. याबाबत नगर आगारप्रमुखांकडे तक्रार करून श्रीगोंदा आगारप्रमुख होले यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहे, असे मुख्याध्यापक रामराव भोसले यांनी सांगितले.
Latest Marathi News Nagar : खिळखिळी बस अन् विद्यार्थ्यांना मनस्ताप ! Brought to You By : Bharat Live News Media.
