जालना : परतूर वाटुर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; दोन जखमी
परतूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : परतूरहून वाटूरकडे जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने समोरुन धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाला तर दोघेजण गंभीर झाल्याची घटना घडली. जखमींमध्ये वडील आणि मुलगी यांचा समावेश आहे. ही घटना शनिवारी (दि. २३) ३ वाजताच्या सुमारास घडली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन जनार्दन नरवडे (वय 23 रा. नांदलगाव ता. पैठण), विनोद पांडे, प्रेरणा विनोद पांडे (रा. बिडकीन) हे तिघे दुचाकीवरून (क्र.एमएच 20 एफआर 7491) परतूरहून वाटूर मार्गे बिडकीनला जात होते. परतूर वाटूर रस्त्यावर मांडावा देवी मंदिरापासून काही अंतरावर समोरून येणारे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक देऊन पसार झाले. या अपघातात नितीन जनार्दन नरवडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर विनोद पांडे आणि त्याची मुलगी गंभीर जखमी झाली. उपस्थितांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात हलविले. दोघेजण बिडकीनहून परतूर येथील नवोदय विद्यालयात मुलीला घेऊन जाण्यासाठी आले असल्याची माहिती मिळाली. रात्री उशिरा पर्यंत पोलिसात अपघाताची नोंद घेण्याची कारवाई सुरु होती.
Latest Marathi News जालना : परतूर वाटुर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; दोन जखमी Brought to You By : Bharat Live News Media.