डॉ. महेश बरामदे
वजन… सध्याच्या काळातला सर्वाधिक चर्चेतला मुद्दा. आरोग्याबाबत वाढलेल्या जागरुकतेमुळे हल्ली जो तो आपले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी घरबसल्या किंवा घराबाहेर जाऊन झटताना दिसतो. कारण वाढत्या वजनासोबत येणारे विविध आजार. त्याचबरोबर अशक्तपणामुळे वजन वाढवण्यासाठीही तब्येतीने प्रयत्न करणारे असतात; पण वजन कमी करण्याआधी किंवा वाढवण्याआधी, आपल्या सर्वांसाठी योग्य वजन जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
यासाठी वजनकाट्याचा वापर केला जातो; परंतु कधी-कधी मशीन कमी किंवा जास्त वजन दर्शवते. अशा स्थितीत मशीनमध्ये बिघाड झाल्याचे आपल्याला वाटते; पण तसे नाही. चुकीच्या वजन तपासणीमुळे तुम्हाला योग्य वजन समजत नाही. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या की, वारंवार वजन तपासण्याची सवय चांगली नाही. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही तुमचे वजन आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा तपासू नये. याशिवाय, काही परिस्थिती आहेत, ज्यात वजन मोजणे टाळले पाहिजे. उदाहरणार्थ, काही लोकांना व्यायाम केल्यानंतर लगेच परिणाम हवा असतो; पण ही पद्धत चुकीची आहे. यातून तुम्हाला योग्य परिणाम मिळणार नाहीत. व्यायाम केल्यानंतर शरीरातून मोठ्या प्रमाणावर घाम बाहेर येतो. परिणामी, शरारीतील द्रव प्रमाण कमी होते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही वजन तपासले असता ते अचूक वजन म्हणता येणार नाही.
अशाच प्रकारे वीकेंडनंतर लगेच तुमचे वजन तपासणे टाळावे; कारण बहुतेक लोक वीकेंडला त्यांचे आवडते पदार्थ मनसोक्त प्रमाणात खातात. तसेच शनिवार व रविवार बहुतांश लोक फारसे सक्रिय नसतात. बरेच जण आठवड्याच्या शेवटी जिम आणि व्यायामातून विश्रांती घेत आराम करतात. अशा वेळी वजन तपासल्यास ते योग्य वजन म्हणता येणार नाही.
मासिक पाळीदरम्यान महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होत असतात. अशा वेळी वजन तपासणे टाळावे, कारण यावेळी तपासले जाणारे वजन बरोबर नसेल. आणखी एक मुद्दा म्हणजे, बद्धकोष्ठतेमुळे वजन तात्पुरते वाढते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर झाल्यानंतर वजन तपासावे. सोडियम किंवा मीठ असलेले अन्न अधिक प्रमाणात खाल्ल्यानंतरही वजन तपासू नये.
वजन तपासण्यासाठी योग्य वेळ
वजन करण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळ. वजन नेहमी सकाळी फ्रेश झाल्यानंतर आणि प्रातःविधी आटोपल्यानंतर तपासले पाहिजे. वजन तपासताना अंगावर फक्त रोजचा ड्रेस परिधान केलेला असावा.
The post वजन तपासताय? जाणून घ्या ‘ही’ महत्त्वाची माहिती appeared first on Bharat Live News Media.