आर्थिक उन्नतीमधूनच महिलांचे सक्षमीकरण शक्य : प्रा. कविता आल्हाट
पिंपरी : विविध सणांच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठा उपलब्ध करून दिल्यास त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांनी केले. आर्थिक उन्नतीमधूनच महिलांचे सक्षमीकरण शक्य आहे, असेदेखील प्रा. आल्हाट म्हणाल्या. लक्षवेध स्पोर्ट्स फाउंडेशन व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने महिला आर्थिक सक्षमीकरण मेळावा मोशीतील जय गणेश लॉन्स येथे झाला.
यानिमित्ताने प्रा.आल्हाट बोलत होत्या. कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पीडीसीसी बँकेचे लक्ष्मण मातळे, माजी नगरसेवक वसंत बोराटे, मंदा आल्हाट, सारिका बोर्हाडे, सामाजिक कार्यकर्ते गुलाब बनकर, प्रदेश स्वयंरोजगार सेल अध्यक्ष मेघा पवार, प्रदीप आहेर, युवा नेते विशाल आहेर, संगीता आहेर, अर्चना सस्ते आदी उपस्थित होते. प्रा. आल्हाट म्हणाल्या की, अशा प्रकारचा आर्थिक सक्षमीकरण मेळावा घेण्याचे मुख्य कारण हेच आहे की, महिलांना स्वयंरोजगार मिळायला हवा. स्वयंरोजगारातून त्यांना आर्थिक पाठबळ मिळाले तरच त्यातून त्यांची प्रगती निश्चित होणार आहे.
याही पुढे जाऊन विविध सणांच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. या वेळी पीडीसीसी बँकेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी योजनांची माहिती व कर्जमाफी सवलती यांचे मार्गदर्शन बँकेचे संचालक प्रवीण शिंदे यांनी केले. तसेच बँकेचे सुजीत शेख यांनी महिलांना डिजिटल साक्षरताविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना हर्बल उत्पादनांचे प्रशिक्षण देण्यात आले. महिला घरातूनच स्वतःचा व्यवसाय कसा चालू करू शकतात याचीदेखील माहिती त्यांना देण्यात आली.
बचतगटांच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तूंना बाजारपेठेत मागणी आहे. महिला बनवित असलेल्या उत्पादने, नवनवीन वस्तू व उपक्रमाला शासनातर्फेदेखील प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होत असतो. या उत्पादनांच्या विक्रीसाठी तालुका, जिल्हा पातळीवर जागा उपलब्ध करून दिली जाते. याची माहिती महिलांना व्हावी हाच प्रयत्न या मेळाव्याच्या आयोजनाचा आहे. शासनाच्या योजना, सवलती, बँकांकडून होणारा कर्जपुरवठा अशी सर्व माहिती महिलांनी घ्यावी आणि संधीचे सोने करावे.
– अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.
हेही वाचा
Pimpri Crime News : कोट्यवधींचा ऐवज मिळाला परत
‘टीडीआरप्रकरणी एसआयटी स्थापन करावी : चेतन बेंद्रे
विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन खात्याने दिले जीवदान
The post आर्थिक उन्नतीमधूनच महिलांचे सक्षमीकरण शक्य : प्रा. कविता आल्हाट appeared first on Bharat Live News Media.