पिंपरी : शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत
पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील पंपिंग स्टेशनमधील टप्पा क्रमांक तीन व चारच्या रायझिंग मेनला (मुख्य जलवाहिनी) गळती सुरू झाल्यामुळे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बुधवारी (दि.20) सायंकाळी खंडित झाला. त्यामुळे त्या भागांतील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. पाणीपुरवठा विभागाने दुरूस्ती काम तातडीने हाती घेतले आहे.
या कामामुळे टप्पा तीन व चारच्या जलवाहिनीवरील चिंचवडचा काही भाग, नेहरुनगर, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, वाकड, निगडी, प्राधिकरण, ताथवडे, किवळे, मामुर्डी, चिखली, मोशीचा काही भाग, जाधववाडी, रुपीनगर, तळवडे, कृष्णानगर, यमुनानगर, आकुर्डी या भागातील पाणीपुरवठा सायंकाळी बंद करण्यात आला. त्यामुळे त्या भागांतील रहिवाशांची गैरसोय झाली. तसेच, या भागांत गुरूवारी (दि.21) सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार आहे.
नेहरूनगर येथे जलवाहिनी फुटून पाण्याचा अपव्यय
पिंपरी : नेहरूनगर येथील संतोषी माता चौकात पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटली आहे. त्यातून दररोज हजारो लिटर पाण्याची गळती होऊन पाणी वाया जात आहे. हा पाण्याचा अपव्यय पाहून नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पाणीबचतीसाठी महापालिकेकडून गेल्या सहा ते सात वर्षांपासून एक दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जात आहे. काही वेळेला हा पुरवठा कमी दाबानेदेखील होतो. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात पाणीटंचाईची समस्या आहे. तर काही सोसायट्यांना पाणीटंचाईमुळे टँकर घ्यावा लागतो. तर दुसरीकडे शहरात कोठे ना कोठे जलवाहिनी फुटल्याने, चेंबर गळतीमधून पाण्याचा अपव्यय सुरू आहे.
उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा
गळती दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.
हेही वाचा
विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन खात्याने दिले जीवदान
प्रदूषणकारी प्रकल्पांवर कारवाई करा : आ. राहुल शेवाळे यांची मागणी
पाळीव कुत्र्याने हल्ला केला ; मालकावर गुन्हा दाखल !
The post पिंपरी : शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत appeared first on Bharat Live News Media.