पुणे : ’एटीएमएस’ अहवाल : मनपा आयुक्तांचा आदेश झुगारला!
पुणे : शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध चौकांमध्ये उभारण्यात आलेल्या एटीएमएस (एण्टीव्ह ट्रैफिक मॅनेजमेंट सिस्टिम) सिग्नल यंत्रणेतील त्रुटी दूर करून दहा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी 26 ऑक्टोबर रोजी दिले होते. मात्र, अद्यापही यासंदर्भातील अहवाल महापालिकेला न देता स्मार्ट सिटी आणि संबंधित ठेकेदाराने आयुक्तांच्या आदेशाला
केराची टोपली दाखवली आहे.
शहरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढल्याने कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून प्रमुख रस्त्यांवरील 125 चौकांमध्ये अत्याधुनिक एटीएमएस सिग्नल यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेतले आहे. सुमारे 102 कोटी 62 लाख रुपयांचे हे काम नवी दिल्लीच्या कंपनीला देण्यात आले. पुढील पाच वर्षे ही यंत्रणा चालविणे व देखभाल दुरुस्ती करणे, यासाठी प्रतिवर्षी 11 कोटी 58 लाख असा एकूण 57 कोटी 94 लाख रुपये खर्चही येणार आहे.
एटीएमएस सिग्नल बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, जवळपास 115 चौकामध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र, एटीएमएस सिग्नल यंत्रणा बसवल्यानंतर पूर्वी वाहतूक कोंडी होत नसलेल्या रस्त्यांवर व चौकांमध्ये कोंडी होत आहे. ज्या प्रमुख रस्त्यावर (कॉरीडॉर) ही यंत्रणा बसवण्यात आलेली आहे, त्या रस्त्याला जोडणार्या उपरस्त्यांवर दररोज सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यासंदर्भात महापालिक आयुक्त विक्रम कुमार यांच्यासमोर 26 ऑक्टोबर रोजी महापालिकेत एटीएमएस यंत्रणा बसविणार्या कंपनीने सादरीकरण केले.
या वेळी स्मार्ट सिटीचे वरिष्ठ अधिकारी व पोलिस अधिकारीही उपस्थित होते. या वेळी यंत्रणेतील त्रुटीबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींना काही प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. यंत्रणा बसवताना केवळ त्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा विचार करण्यात आला आहे. त्या रस्त्याला जोडणार्या उपरस्त्यांचा विचार केला नाही, उपरस्त्यांवर ही यंत्रणा बसवल्यानंतर तेथीलही वाहतुकीचा प्रश्न सुटेल, असे सांगण्यात आले.
हेही वाचा
मराठा आरक्षणाला विरोध शरद पवारांचाच : देवेंद्र फडणवीस
शरद पवारांचे निकटवर्तीयच मनोज जरांगे यांचे मार्गदर्शक : नितेश राणे
कोल्हापुरात आणखी 17 एमएलडी एसटीपीसाठी प्रयत्न
The post पुणे : ’एटीएमएस’ अहवाल : मनपा आयुक्तांचा आदेश झुगारला! appeared first on Bharat Live News Media.