क्रीडा : विश्वचषकाची ‘ड्रेस रिहर्सल’!

मागील आठवड्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका जरूर जिंकली; पण ती पूर्ण मालिका आयसीसी वन-डे विश्वचषक फायनलमधील निराशाजनक पराभवाच्या सावटाखालीच खेळवली गेली, हे सुस्पष्ट आहे. पुढील वर्षातील जून महिन्यात विंडीज व अमेरिकेत होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, भारत-ऑस्ट्रेलिया ही मालिका एक रंगीत तालीम मानली, तर मात्र यात अनेक सकारात्मक बाबी आढळून येतात. संघातील 4-5 … The post क्रीडा : विश्वचषकाची ‘ड्रेस रिहर्सल’! appeared first on पुढारी.
#image_title

क्रीडा : विश्वचषकाची ‘ड्रेस रिहर्सल’!

विवेक कुलकर्णी

मागील आठवड्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका जरूर जिंकली; पण ती पूर्ण मालिका आयसीसी वन-डे विश्वचषक फायनलमधील निराशाजनक पराभवाच्या सावटाखालीच खेळवली गेली, हे सुस्पष्ट आहे. पुढील वर्षातील जून महिन्यात विंडीज व अमेरिकेत होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, भारत-ऑस्ट्रेलिया ही मालिका एक रंगीत तालीम मानली, तर मात्र यात अनेक सकारात्मक बाबी आढळून येतात. संघातील 4-5 खेळाडूंचा प्रभावशाली खेळ, सूर्यकुमारच्या कल्पक नेतृत्वाची चुणूक याचा यात प्राधान्याने समावेश होतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध अलीकडेच संपन्न झालेली टी-20 मालिका ही पुढील वर्षातील टी-20 विश्वचषक स्पर्धेची रंगीत तालीम मानली, तर अनेक सकारात्मक बाबी आढळून येतात खर्‍या; पण मुळातच खरे नुकसान त्यापूर्वी वन-डे विश्वचषकाच्या फायलनमध्ये होऊन गेले होते. क्रिकेट हा भारतात जणू धर्मासमान असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत चाहत्यांची गर्दी जरूर दिसून आली; पण तो जोश त्यात नव्हता आणि मालिकेतही त्याचे काही प्रमाणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पडसाद उमटणे साहजिकच होते.
मुळात, आयसीसी वन-डे विश्वचषकामुळे थकल्या-भागलेल्या दोन्ही संघांनी आधीच्या लाईनअपमध्ये निम्म्यापेक्षा अधिक चेहरेमोहरे बदलले होते आणि ते साहजिकही होते. भारताच्या वन-डे विश्वचषक संघातील केवळ तीनच खेळाडू या मालिकेत खेळले आणि त्यातही श्रेयस अय्यर मालिकेतील शेवटच्या केवळ दोन लढतींत सहभागी झाला होता. ऑस्ट्रेलियानेही ट्रॅव्हिस हेड वगळता सहा खेळाडूंना तिसर्‍या सामन्यापर्यंत मायदेशी रवाना केले आणि युवा खेळाडूंवर भर देण्याचे धोरण अवलंबले. याचा अर्थ एकच होता, दोन्ही संघांनी एकीकडे वन-डे वर्ल्डकपचा शीण कमी करत असताना, दुसरीकडे पुढील वर्षातील टी-20 वर्ल्डकपसाठी तयारीवरही लक्ष केंद्रित केले.
या बदलांमुळे झाले असे की, मालिकेत दोन्ही संघांकडे स्टार पॉवरचा बर्‍याच अंशी अभाव होता; पण तरीही अवघ्या सात महिन्यांवर येऊन ठेपलेल्या टी-20 विश्वचषकाच्या द़ृष्टीने ही स्पर्धा विशेष महत्त्वाची होती. पुढील सात महिन्यांमधील एकंदरीत क्रिकेट कॅलेंडर पाहता अन्य संघांप्रमाणेच भारताच्या वाट्यालाही फारसे टी-20 सामने नसतील, हे निश्चित आहे. त्यामुळे अगदी एकेक मालिका विश्वचषकाच्या तयारीसाठी अनन्यसाधारण महत्त्वाची असणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका झाल्यानंतर जानेवारीत अफगाणविरुद्ध आणखी एक मालिका होईल आणि त्यानंतर या क्रिकेट प्रकारात फारसा सराव मिळणार नाही. त्यामुळे, जूनच्या उंबरठ्यावर 15 सदस्यीय संघ निश्चित करण्यापूर्वी या मालिकेतील कामगिरीवर भारतीय थिंक टँकचे बारीक लक्ष असणे साहजिकच.
या मालिकेत युवा खेळाडूंनी दाखवलेली चुणूक प्रकर्षाने नजरेत भरणारी ठरली. ऋतुराज गायकवाडपासून यशस्वी जैस्वालपर्यंत आणि रवी बिष्णोईपासून मुकेश कुमारपर्यंत सर्वच युवा खेळाडूंनी या मालिकेत मिळालेल्या संधीचे पुरेपूर सोने केले. ऋतुराज व जैस्वाल यांनी सलामीला काही खणखणीत डाव साकारत फ्लाईंग स्टार्ट देण्यात आपण कसे माहिर आहोत, हे दाखवून दिले, तर दुसरीकडे मधल्या व शेवटच्या षटकांत रिंकूने डावाला आकार देण्याबरोबरच फिनिशर म्हणूनही कशी चोख कामगिरी बजावू शकतो, याचाच जणू दाखला दिला.
कारकिर्दीत प्रथमच नेतृत्वाची धुरा सांभाळत असलेल्या सूर्यकुमार यादवनेदेखील उत्तम चुणूक दाखवली. नियमित कर्णधार रोहित शर्माची टी-20 क्रिकेटमधील यापुढील कारकीर्द अनिश्चिततेच्या भोवर्‍यात असल्याने सूर्यकुमारचा पुढे आलेला पर्याय अर्थातच आश्वासक असणार आहे. हार्दिक पंड्याने नेतृत्व गुणांची छाप सोडली असली, तरी सातत्याने त्याला होणार्‍या दुखापती हा अर्थातच चिंतेचा विषय आहे. आता एखाद्या पाच सामन्यांच्या मालिकेतील कामगिरीवरून नेतृत्वाची दशा व दिशा ठरवणे खूपच घाईचे; पण एक उत्तम सुरुवात सूर्यकुमारने केलेली आहे, हे सुस्पष्ट आहे.
सूर्यकुमारच्या नेतृत्वाबद्दल अर्शदीपने अतिशय बोलके निरीक्षण नोंदवले. तो म्हणाला होता, ‘सूर्याने आम्हाला फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर मोकळीक दिली आणि त्यामुळेच आम्ही आमच्या क्षमतेला न्याय देऊ शकलो. मालिकेतील बर्‍याच खेळपट्ट्यांवर फलंदाजीला पोषक वातावरण होते. मात्र, त्याने आम्हा गोलंदाजांना स्पष्टपणाने सांगितले की, काही आव्हाने जरूर आहेत; पण संधीही असेल!’
संधी मिळालेले युवा खेळाडू एकीकडे उत्तम चुणूक दाखवत असताना त्यात अक्षर पटेलचा टी-20 सेटअपमध्ये समावेश नसावा, हे विरोधाभासी चित्र होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी टी-20 मालिकेत कोणत्याही कारणाशिवाय त्याला वगळले जाणे अर्थातच अनपेक्षित होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत अक्षरने एकंदरीत 20 षटके गोलंदाजी करताना 6 बळी घेतले आणि त्याची इकॉनॉमीही किफायतशीर राहिली. जडेजाप्रमाणे त्यानेही चिन्नास्वामीवर फलंदाजीत 21 चेंडूंत 31 धावांची आतषबाजी करत आपली उपयुक्तता दाखवून दिली.
अर्थात, यात काही त्रुटीही होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच टी-20 सामन्यांत भारताने केवळ गोलंदाजीत पाचच पर्याय सातत्याने आजमावून पाहिले. त्यांनी यादरम्यान एकही नवा प्रयोग राबवून पाहिला नाही. अगदी काहीच नाही, तर मध्यमगती गोलंदाजी अष्टपैलू शिवम दुबेला ते आजमावून पाहू शकले असते; पण तो प्रयोगही झाला नाही. आणखी विरोधाभास म्हणजे याच दुबेने 2023 ची आयपीएल स्पर्धा गाजवली; पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध राखीव खेळाडूत बसून काढल्यानंतर त्याला आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघात स्थानही मिळालेले नाही.
मुळात भारताकडे जलदगती गोलंदाजी अष्टपैलूंची प्रचंड उणीव आहे. हार्दिक पंड्या सातत्याने दुखापतींनी त्रस्त असताना त्याच्या चणीचा दुसरा जलदगती गोलंदाजी अष्टपैलू अवघ्या सात महिन्यांत घडवणे अशक्य कोटीतील आहे; पण ‘प्लॅन ए’ यशस्वी होत नसेल, तर हाताशी ‘प्लॅन बी’ असावा लागतो, हे जगरहाटीचे तत्त्व विसरून पुढील वाटचाल कशी सोपी असणार, याचा विचारच केलेला बरा.
आता वन-डे विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर केवळ तीनच दिवसांत इतक्या लगबगीने ही मालिका भरवणे काय साध्य करणारे होते, हाही
कळीचा प्रश्न आहेच; पण जुने, अनुभवी खेळाडू काळानुरूप टी-20 च्या लाटेतून दूर होत असताना त्यांच्या जागी ताज्या दमाचे खेळाडू रंग भरत आहेत, त्यांची उणीव भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत, हे चित्र काही प्रमाणात का होईना; पण दिलासा देणारे ठरते. आजपासूनच खेळवल्या जाणार्‍या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत आगामी आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक रिहर्सल रंगेलच. याशिवाय, जूनमधील विश्वचषकात संघाची रूपरेषा कशी असेल, ती या मालिकेच्या निमित्तानेही दिसून येणार आहे.
वन-डे वर्ल्डकपने दिलेला धडा कसा विसरणार?
या महिन्यात संपन्न झालेल्या आयसीसी वन-डे विश्वचषक स्पर्धेत साखळी फेरीतील 9 आणि उपांत्य फेरीतील एक, अशा एकूण 10 लढतींत भारताचा वारू चांगलाच उधळला होता; पण अंतिम लढतीत अचानक या सार्‍या वाटचालीला खो बसला आणि त्याचे मुख्य कारण होते, संघातील एक्स फॅक्टर खेळाडूचा अभाव! ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या त्या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात हार्दिक पंड्यामुळे संघ बराच समतोल होता आणि गोलंदाजीत असो वा फलंदाजीत, त्याचे मोक्याच्या क्षणी निर्णायक योगदान अतिशय उपयुक्त ठरत होते. याचमुळे शमीसारख्या अव्वल गोलंदाजालादेखील काही वेळ राखीव खेळाडूंमध्ये बसून राहावे लागले होते.
मात्र, चौथ्या लढतीत पंड्याला अनपेक्षित दुखापत झाली आणि सार्‍याच समीकरणांची उलथापालथ झाली. पंड्याच्या तोडीचा दुसरा अष्टपैलू उपलब्ध नसल्याने भारतीय थिंक टँकला सूर्यकुमार यादव व शमी, असे दोन खेळाडू संघात सामावून घेणे भाग होते आणि या सार्‍या वाटचालीत संघाचा समतोल बिघडला तो बिघडलाच. सर्वात धक्कादायक म्हणजे, या बिघडलेल्या समीकरणाचे मोल भारताला वर्ल्डकप गमावण्याच्या रूपाने मोजावे लागले आणि हातातोंडाशी आलेला विश्वचषक विजयाचा घास हिरावला गेला. एखाद्या एक्स फॅक्टर खेळाडूची उणीव किती फटका देऊन जाणारी ठरते, हे वन-डे विश्वचषकाने दाखवून दिले; पण त्यापासून भारत कितपत धडा घेणार, यावर पुढील टी-20 विश्वचषकातील यशापयश अवलंबून असेल.
The post क्रीडा : विश्वचषकाची ‘ड्रेस रिहर्सल’! appeared first on पुढारी.

मागील आठवड्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका जरूर जिंकली; पण ती पूर्ण मालिका आयसीसी वन-डे विश्वचषक फायनलमधील निराशाजनक पराभवाच्या सावटाखालीच खेळवली गेली, हे सुस्पष्ट आहे. पुढील वर्षातील जून महिन्यात विंडीज व अमेरिकेत होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, भारत-ऑस्ट्रेलिया ही मालिका एक रंगीत तालीम मानली, तर मात्र यात अनेक सकारात्मक बाबी आढळून येतात. संघातील 4-5 …

The post क्रीडा : विश्वचषकाची ‘ड्रेस रिहर्सल’! appeared first on पुढारी.

Go to Source