कायदाच नव्हे; तर मराठा आरक्षण देणार : मुख्यमंत्री शिंदे
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : तीन राज्यांत सत्ता येणार म्हणून डोळे लावून बसलेल्या विरोधकांना तेथे अत्यंत मोठा पराभव सहन करावा लागल्याने ते आता पुरते हतबल झाले असून, त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होतील याची हमी जनतेने देऊन टाकली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. मराठा आरक्षणाचा केवळ कायदा करणार नाही. त्यापेक्षा सर्व प्रक्रिया पूर्ण करून टिकणारे आरक्षण देऊ. त्यावर आम्ही युद्धपातळीवर काम करत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. (Eknath Shinde)
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज, गुरुवारपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना चहापानाचे निमंत्रण दिले होते. मात्र, विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करत चहापानावर बहिष्कार घातला. हा बहिष्कार टाकताना विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. या पत्रात विरोधी पक्षाने सरकारवर अनेक आरोप केले आहेत. या आरोपांचा आणि विरोधकांच्या टीकेचा शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला.
विरोधी पक्षाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर दिल्लीच्या कठपुतली म्हणून टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना, ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायचीही परवानगी नाही त्यांनी आमच्यावर आरोप करू नयेत आणि स्वाभिमानाची भाषा बोलू नये. सत्ता काबीज करण्याचे ज्यांचे स्वप्न होते ते तीन राज्यांच्या निवडणूक निकालाने भंगले आहे. सत्ता काबीज करण्याचे त्यांचे दोर पूर्णपणे कापले गेले आहेत. आम्ही लोकांसाठी काम करतो आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या दोर्या लोकशाहीच्या आणि लोकांच्या हाती आहेत, असे शिंदे म्हणाले.
आम्ही दिल्लीला जातोे ते निधी आणण्यासाठी आणि त्याच्या पाठपुराव्यासाठी जातो. कारण, मागितल्याशिवाय काही मिळत नाही. गेल्या अडीच वर्षांत मागच्या अहंकारी सरकारला त्यांच्या अहंकारामुळे केंद्र सरकारने पैसे दिले नाहीत. आपल्या अहंकारामुळे त्यांनी राज्याचे नुकसान केले, अनेक प्रकल्प बंद पाडले. अनेक प्रकल्प स्थगित केले. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही मेट्रोपासून समृद्धीपर्यंत अनेक प्रकल्प पुढे नेले, असेही शिंदे म्हणाले. (Eknath Shinde)
कायदा आणि सुव्यवस्था तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करणार्या विरोधी पक्षाला शिंदे यांनी आपल्या शायरीतून उत्तर दिले. ‘मुंह खोलने से पहले सोचना सीख लें, पहले तो अपने अंदर झाँक के देख लें!’, तुम्ही लोक आधी तुमचे बघा आणि मग सरकारवर टीका करा, असे त्यांनी सुनावले.
टिकणारे आरक्षणच देणार!
यावेळी एकनाथ शिंदे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावर राज्य सरकारच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. आम्ही मराठा आरक्षणाचा केवळ कायदा करणार नाही. त्यापेक्षा सर्व प्रक्रिया पूर्ण करून टिकणारे आरक्षण देऊ. त्यावर आम्ही युद्धपातळीवर काम करत आहोत. न्या. शिंदे समितीबाबत छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर आपण त्यांच्याशी बोललो आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
माणसे मरत असताना काही लोक पैसे बनवत होते
विरोधी पक्षाने ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराचे आरोप केले ते पाहता कुणी कशामध्ये भ्रष्टाचार केला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. खिचडीमध्ये, बॉडीबॅगमध्ये, प्राणवायूनिर्मिती प्रकल्पामध्ये, कोरोनामध्ये माणसे मरत असताना काही लोक पैसे बनवत होते. हे पाप तुम्ही कुठे फेडणार? ज्याच्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू झाले ते सर्व बाहेर येईलच, असे शिंदे यांनी बजावले.
हेही वाचा :
Pranab Mukherjee : ‘..तर ते पंतप्रधान कसे होतील?’ राहुल गांधींबद्दल काय म्हणाले होते प्रणव मुखर्जी?
Kolhapur Unemployment Rate : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ८ लाख बेरोजगार!
Udaya Sugar: ‘उदय साखर ‘चा ३२०० रुपये ऊसदर जाहीर; एफआरपीपेक्षा १५८ रुपये अधिक
The post कायदाच नव्हे; तर मराठा आरक्षण देणार : मुख्यमंत्री शिंदे appeared first on पुढारी.
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : तीन राज्यांत सत्ता येणार म्हणून डोळे लावून बसलेल्या विरोधकांना तेथे अत्यंत मोठा पराभव सहन करावा लागल्याने ते आता पुरते हतबल झाले असून, त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होतील याची हमी जनतेने देऊन टाकली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. …
The post कायदाच नव्हे; तर मराठा आरक्षण देणार : मुख्यमंत्री शिंदे appeared first on पुढारी.