ऑस्ट्रेलियावर शेवटच्या षटकात रोमहर्षक विजय; भारताने 4-1 ने मालिका जिंकली
बंगळूर : वृत्तसंस्था भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 6 धावांनी हरवून मालिका 4-1 अशी जिंकली. बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 160 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघ विजयाच्या जवळ पोहोचला होता. शेवटच्या षटकांत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 10 धावांची आवश्यकता होती आणि चेंडू होता अर्शदीपसिंगच्या हातात. अर्शदीपने पहिल्या तीन षटकांत 37 धावा दिल्या होत्या. मैदानावर कर्णधार मॅथ्यू वेड असल्यामुळे ऑस्ट्रेलिया सहज जिंकेल, असे वाटत होते; परंतु अर्शदीपने कमालीची जिगरबाज गोलंदाजी करीत मॅथ्यू वेडच्या विकेटसह फक्त तीनच धावा देत सामना भारताला जिंकून दिला. 4 षटकांत 14 धावा देऊन 1 विकेट घेणारा अक्षर पटेल सामनावीर ठरला.
बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताच्या 161 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करणार्या ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का 22 धावांवर बसला. जोस इंग्लिशचा (4) मुकेशकुमारने त्रिफळा उडवला. या मालिकेत सातत्याने विकेट घेणार्या रवी बिष्णोईने अॅरोन हार्डी (6) आणि टॅव्हिस हेड (28) यांना बाद केले. दुसरीकडे बेन मॅक्डरमॉट मात्र फटकेबाजी करीत होता. त्याच्या जोडीला टिम डेव्हिड आला. दोघांनी धावांचा वेग वाढवला. त्यांची फुलत जाणारी भागीदारी अक्षर पटेलने तोडली. त्याने टिम डेव्हिडला (17) बाद केले. दोघांनी 47 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मॅक्डरमॉटने अर्शदीपला षटकार ठोकून आपले अर्धशतक पूर्ण केले, पण याच षटकात अर्शदीपने त्याला बाद केले. रिंकू सिंगने 17 मीटर धावत जाऊन उत्कृष्ट झेल पकडला. त्याने 54 धावा केल्या. यानंतर मुकेेशकुमारने मॅथ्यू शॉर्ट (16) आणि डीवॉरशूईस (0) यांना पाठोपाठच्या चेंडूवर बाद केले. यावेळी ऑस्ट्रेलियाला 20 चेेंंडूंत 32 धावा हव्या होत्या.
आवेश खानच्या 18 व्या षटकांत मॅथ्यू वेडने सलग 3 चौकार ठोकल्याने 15 धावा गेल्या. त्यामुळे शेवटच्या दोन षटकांत 17 धावांचे टार्गेट पाहुण्या संघापुढे उरले. 19 व्या षटकांत मुकेशकुमारच्या पहिल्याच चेेंडूवर ऋतुराज गायकवाडने मॅथ्यू वेडचा झेल सोडला. या षटकात 7 धावा गेल्या, त्यामुळे शेवटच्या षटकांत 10 धावांचे टार्गेट उरले. शेवटचे षटक टाकणार्या अर्शदीप सिंगने पहिले दोन चेंडू डॉट टाकून वेडवर दबाव आणला. हा दबाव झुगारण्याच्या प्रयत्नात तिसर्या चेंडूवर वेडने श्रेयस अय्यरकडे झेल दिला. वेड 22 धावांवर बाद झाला. यानंतर पुढच्या तीन चेंडूंवर एकेरी धावा निघाल्या. अर्शदीपने शेवटच्या षटकात वेडची विकेट घेत फक्त 3 धावा दिल्याने भारताने 6 धावांनी हा सामना जिंकला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. यशस्वी जैस्वालने 15 चेंडूंत 21 धावांची वादळी खेळी करून भारताला दमदार सुरुवात करून दिली. जेसन बेहरेनडॉर्फने टाकलेल्या चौथ्या षटकात त्याला बाद केले. पाचव्या षटकात ऋतुराज गायकवाड (10) बेन डीवॉरशूईसच्या गोलंदाजीवर सोपा झेल देऊन परतला. द्विदेशीय ट्वेंटी-20 मालिकेत सर्वाधिक धावा करणार्या भारतीय फलंदाजांमध्ये ऋतुराजने (223) तिसरे स्थान पटकावले. विराट कोहली (231 वि. इंग्लंड 2021) आणि लोकेश राहुल (224 वि. न्यूझीलंड, 2020) हे आघाडीवर आहेत. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच ट्वेंटी-20 मालिकेत सर्वाधिक 218 धावांचा मार्टीन गुप्तीलचा विक्रम ऋतुराजने मोडला.
सूर्यकुमार यादवला भोपळ्यावर जीवदान मिळाले; परंतु त्याचा फार काळ फायदा झाला नाही. डीवॉरशूईसच्या गोलंदाजीवर सूर्या (5) पॉईंटलाच मॅक्डरमॉटच्या हाती झेल देऊन परतला. बिनबाद 33 वरून भारताची अवस्था 3 बाद 46 अशी झाली. तनवीर संघाने त्याच्या फिरकीची जादू दाखवली. हार्ड हिटर रिंकू सिंग 6 धावांवर झेलबाद झाला.
जितेश शर्मा व श्रेयस अय्यर यांनी 24 चेंडूंत 42 धावांची भागीदारी केली, परंतु अॅरोन हार्डीने ही सेट जोडी तोडली. तिलक 16 चेंडूंत 24 धावा करून माघारी परतला. श्रेयस एका बाजूने खेळपट्टीवर उभा राहिला होता आणि भारताला मोठी धावसंख्या उभारून देण्याची जबाबदारी त्याच्याच खांद्यावर होती. अक्षर पटेलची (31) त्याला उत्तम साथ लाभली आणि 46 धावा जोडल्या. श्रेयसने 36 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तो 37 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 53 धावांवर बाद झाला. भारताने 8 बाद 160 धावा केल्या.
The post ऑस्ट्रेलियावर शेवटच्या षटकात रोमहर्षक विजय; भारताने 4-1 ने मालिका जिंकली appeared first on पुढारी.
बंगळूर : वृत्तसंस्था भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 6 धावांनी हरवून मालिका 4-1 अशी जिंकली. बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 160 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघ विजयाच्या जवळ पोहोचला होता. शेवटच्या षटकांत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 10 धावांची आवश्यकता होती आणि चेंडू होता …
The post ऑस्ट्रेलियावर शेवटच्या षटकात रोमहर्षक विजय; भारताने 4-1 ने मालिका जिंकली appeared first on पुढारी.