१७ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने नागरिकांचा संताप
मनमाड (नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा – शहरातून जाणाऱ्या पुणे – इंदूर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून हा महामार्ग वाहनधारक आणि नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. शुक्रवारी (दि. २१) सायंकाळी या मार्गावर दुचाकीवरून जाताना कंटेनरखाली सापडून १७वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईक आणि नागरिकांनी शनिवारी (दि. २२) इंदूर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिस प्रशासनाने आंदोलकांची समजूत काढल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
अनोश व्यवहारे
शुक्रवारी सायंकाळी महामार्गावरून आपल्या दुचाकीने जात असताना अनोश व्यवहारे या 17 वर्षीय मुलाचा कंटेनरखाली सापडून मृत्यू झाला. शनिवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करून परतणारे नातेवाईक व नागरिकांमध्ये संताप असल्याने त्यांनी थेट महामार्गावर ठिय्या देत वाहतूक राेखून धरली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक विस्कळीत झाली हाेती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेत आंदोलकांची समजूत काढल्यावर आंदाेलन मागे घेण्यात आले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
शहरातून जाणाऱ्या पुणे -इंदूर महामार्गावर गेल्या काही वर्षांपासून वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात अवजड वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात वाढले असून, त्यात अनेकांचा बळी गेला आहे. दरवेळी नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर प्रशासनाकडून मागण्यांवर त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन देऊन बोळवण करण्यात येते. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
आंदोलकांच्या मागण्या
या महामार्गावर रेल्वेचा ओव्हर ब्रिज असून तो अरुंद आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होऊन अपघात होत आहेत. त्यामुळे या उड्डाणपुलाला पर्याय म्हणून समांतर पूल बांधावा, या महामार्गाचे चौपदरीकरण करावे तसेच शहराबाहेरून वळण मार्ग तयार करावा अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
हेही वाचा:
Monsoon Updates : रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गसह घाटमाथ्यास आज ‘रेड अलर्ट’
चार जणांशी लग्न, पाचव्यांदा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अन् तिचा धक्कादायक शेवट