छ. संभाजीनगर: हर्सूल येथे दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून तरुणाचा खून

छ. संभाजीनगर: हर्सूल येथे दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : मोटारसायकलचा धक्का लागल्याच्या वादातून एकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना हर्सूल परिसरातील जहाँगीर कॉलनीत शुक्रवारी (दि.२१) रात्री घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सैयद अमान (रा. जहाँगीर कॉलनी, हर्सूल) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर शेख शारेक शेख अन्वर (वय २२, रा. फातेमानगर हर्सूल), शेख पप्पू शेख अजिज अशी संशयितांची नावे आहेत.
या प्रकरणी सैय्यद असद सैयद रशीद (वय ४० रा. जहाँगीर कॉलनी हर्सूल) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सैय्यद असद यांचा मुलगा सेय्यद अमान शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास घराजवळ असलेल्या किराणा दुकानाजवळ त्याच्या मित्रासोबत उभा होता. त्या दरम्यान शेख शारेक आणि शेख पप्पू हे दुचाकीवरून भरधाव वेगात जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीचा धक्का अमान याला लागला. त्यावर अमानने मोटारसायकल हळू चालवता येत नाही का, असे त्या दोघांना सुनावले. याचा राग आल्याने शेख शारेक आणि शेख पप्पू याने अमान यास मारहाण करण्यास सुरूवात केली.
कुटुंबियांनाही मारहाण
घराबाहेर गोंधळ सुरू असलल्याचे पाहून आमनची पत्नी व वडील धावून आले. त्या दोघांनी या दोघांनाही मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर शेख शारेक याने त्याच्या हातातील चाकू सय्यद अमान याच्या छातीत खुपसला. त्याक्षणी अमान रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच पडला. जखमी अमानला उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच हर्सूल ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुनिता मिसाळ यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अमान याच्या वडिलांच्या तक्रारीवरून शेख शारेक शेख अन्वर, शेख पप्पू शेख अजिज या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा 

छ.संभाजीनगर : सोलनापूर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
छ.संभाजीनगर: रांजणगाव येथे बोगस कापूस बियाणे विक्रीचा पर्दाफाश; एकाला अटक
छ.संभाजीनगर: सासूरवाडीला जाताना भीषण अपघात; दोन साडूंचा जागीच मृत्यू