पावसाळा आला, सामान्य सर्दीकडे दुर्लक्ष नकाे
डॉ. प्रिया पाटील
उन्हाळ्याच्या चार महिन्यात तापून निघालेले जीवन पावसाळ्याच्या एका सरीने शांत होऊन जाते व पावसाने आनंदाला पारावार उरत नसतो. पण या पावसाबरोबरच होणार्या सर्दीला आपण लहान सहान आजार म्हणू शकत नाही. कारण तो धोकादायक ठरू शकतो.
सामान्य सर्दी ( कॉमन कोल्ड) हा एक संक्रमिक आजार आहे, जो विषाणूमुळे होतो. तो हवेतून शिंकेद्वारे, आजारी माणसाच्या थेट संपर्कात आल्याने, आजारी माणसाच्या वस्तू हाताळल्याने, नाकातून श्वसन मार्गात संक्रमण करतो. जर एखाद्या व्यक्तीला सर्दी, खोकला व त्याबरोबरच ताप असेल तर ती सौम्य आजाराची पहिली लक्षणे असू शकतात.
सामान्य सर्दीचा कालावधी हा पाच ते सात दिवस असतो. ती नियमित औषध घेतल्याने बरी होते; पण अॅलर्जीक सर्दीसोबत अंगदुखी, ताप ही लक्षणे बरेच दिवस असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याची आवश्यकता असते. सामान्य सर्दीची लक्षणे म्हणजे सतत नाक गळणे, नाकातून पाणी वाहणे, सतत न थांबणार्या शिंका नाक गच्च होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे अशी असतात. प्रथम सर्दी पाण्यासारखी वाहते. नंतर जंतुसंसर्ग वाढल्यास तीच सर्दी पिवळी व कालांतराने हिरवट सुद्धा होते. तसेच इतर शारीरिक लक्षणे सुद्धा दिसून येतात. म्हणजे ताप येणे, थंडी वाजून येणे, सौम्य व तीव्र प्रकारची अंगदुखी, घशात जळजळ होणे, डोकेदुखी, कान दुखणे, कान गच्च होणे ही सुद्धा लक्षणे आढळून येतात. वैद्यकीय तपासणीमुळे आपणास फ्लू, डेंग्यू, न्यूमोनियासारख्या आजारांबद्दल सर्वसाधारण माहिती मिळू शकते. कारण हे आजार सुरुवातीला सौम्य ताप, सर्दी, खोकला यापासूनच सुरुवात होतात.
बर्याचदा लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता सामान्य सर्दी साठी परस्पर औषधे घेऊन रिकामे होतात; मात्र त्याच्याकडे फक्त व्हायरल इन्फेक्शन किंवा फ्लू असे न समजता योग्य तो डॉक्टरांच्या सल्ला घेऊन औषध व तपासणी करून आजाराचे निदान करणे सुद्धा गरजेचे असते. पूर्ण रक्ताच्या तपासणीने आपणास पांढर्या पेशी , तांबड्या पेशी व चपट्या पेशी यांची माहिती मिळते. तसेच काही प्रमाणात अॅलर्जीक सर्दी व जुनाट सर्दी याचे सुद्धा निदान होते.
बॅक्टेरियल इन्फेक्शन व व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव
जीवनशैलीत बदल करणे फार गरजेचे आहे. सर्वप्रथम आपण स्वच्छतेवर भर देणे गरजेचे आहे.
घरी आल्यावर स्वच्छ हात पाय धुणे.
शिंकताना नाकाला तोंडासमोर तर खोकताना तोंडाला रूमाल धरावा.
पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे.
बाहेरचे व उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे.
आहारात योग्य तो बदल करावा.
घशाची काळजी घेणे, त्याकरता मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे, हे योग्य ठरते.
नियमित व वेळोवेळी सॅनिटायझर चा वापर करावा.
हलका व्यायाम करावा.
लहान मुलांच्या रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे पावसाळ्यात मुले सुद्धा सारखी आजारी पडू शकतात . त्यामुळे सामान्य सर्दी झाल्यावर मुलांना जीवनशैलीचे बदल सांगून त्यांना सामान्य सर्दीपासून दूर ठेवू शकतो. कारण जशी शाळा चालू होईल तसे सामान्य सर्दीचे प्रमाण हे जास्त पहायला मिळते. त्यामुळे सामान्य सर्दीचे लक्षण दिसताच योग्य तो डॉक्टर सल्ला घेऊन औषध घेणे गरजेचे असते. त्यामुळे येणारा पावसाळा आपला सुखकर होऊ शकतो.