इंडिया आघाडी किमान 295 जागा जिंकणार : मल्लिकार्जुन खरगे
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Election Exit Poll : लोकसभा निवडणुकीत सात टप्प्यांत मतदान झाले असून आता 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल लागण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, एक्झिट पोल समोर येण्यापूर्वी विरोधी पक्ष इंडिया अलायन्समध्ये समाविष्ट असलेल्या राजकीय पक्षांची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत झाली. या बैठकीत निवडणूक निकालानंतर या आघाडी पुढचे पाऊल काय असेल यावर चर्चा झाली. बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, इंडिया आघाडी किमान 295 जागा जिंकेल.
या बैठकीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी पाठ फिरवली. मात्र, टीआर बाळू द्रमुकच्या वतीने बैठकीला उपस्थित होते.
काँग्रेसने पराभव निकालापूर्वीच स्वीकारला
काँग्रेसने एक्झिट पोलवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्षाचा कोणताही प्रवक्ता टीव्ही चॅनेल्सवरील एक्झिट पोलच्या निकालावरील चर्चेत सहभागी होताना दिसणार नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने त्यांचा पराभव निकालापूर्वीच स्वीकारल्याचे भाजपने म्हटले आहे.
भाकपचा ‘400 पार’चा नारा
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने सुरुवातीपासून ‘400 पार’चा नारा दिला. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीला 300 जागा मिळतील असे दावे या आघाडीतील घटक पक्ष करत आहेत. या सर्व राजकीय घडामोडींमध्ये एक्झिट पोलचे निकाल पाहणे रंजक ठरणार आहे.