पागोरी पिंपळगाव ग्रामस्थांचे पाण्यासाठी आंदोलन..!

पागोरी पिंपळगाव ग्रामस्थांचे पाण्यासाठी आंदोलन..!

पाथर्डी तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील पागोरी पिंपळगावला पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून, मंजूर टँकरच्या खेपा नियमित मिळाव्यात व जनावरांना वाढीव पाण्याचे टँकर त्वरित मंजूर करून द्यावेत, या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी पाथर्डी तहसीलार्यालयासमोर उपोषण केले. पंचायत समितीच्या अधिकार्‍यांच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी जोरदार घोषणा देत पाणी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. या आंदोलनात बाळासाहेब ढाकणे, कल्पेश घनवट, राजेंद्र दराडे, मन्सूर पटेल, संभाजी पाचरणे, संपत दराडे, सुनील पाखरे, अंबादास जावळे, आजिनाथ दराडे, एकनाथ वाघमारे, प्रल्हाद दराडे, निवृत्ती नागरे, शहामीर शेख, शरद बडे, सुखदेव नवगिरे आदी सहभागी झाले होते.
पागोरी पिंपळगावला दररोज 70 हजार लिटर पाणी पुरवण्यासाठी टँकरच्या चार खेपा मंजूर आहेत; मात्र चार ते पाच दिवसांना टँकर गावात येतात. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार हे पाणी मिळते. तेही नियमित मिळत नाही. ऊसतोडणी कामगार गावी येत असून त्यांच्याबरोबर मोठे पशुधनसुद्धा आहे. या जनावरांनाही पाणी मिळावे यासाठी अतिरिक्त टँकरने पाणीपुरवठा करावा, त्यासाठी प्रशासनाने अजून दोन टँकर खेपांना मंजुरी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी या वेळी केली.
टँकर चालकाबाबत तक्रारी
दररोज टँकरने पाणीपुरवठा करणे अपेक्षित असताना चार ते पाच दिवसांतून गावात पाण्याचे टँकर येते. त्यात टँकरचालक दारूच्या नशेत असतो, मनमानी वाटेल तिथे परस्पर बाहेर पाणी वितरीत करतो, परिणामी कमी प्रमाणात पाणी गावाला मिळते. टँकर चालकाकडून महिलांना शिवीगाळ होते. त्यामुळे तो टँकरचालक बदलावा, अशीही मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. नळ पाणीपुरवठ्याद्वारे पंधरा ते वीस दिवसांनी पाणी मिळते. तोही पुरवठा सुरळीत झाला पाहिजे. आंदोलनस्थळी पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजय रक्ताटे यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न मांडला. त्या वेळी प्रांताधिकारी मते यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.
जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वाढीव टँकर खेपांना मंजूुीसाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे दिला जाईल, नियमित पाण्याचे टँकर गावात येऊन लोकांना पाणी कसे मिळेल याचे नियोजन केले जाईल. टँकर व चालकाची तत्काळ बदलून दुसरे दिले जातील, असे लेखी आश्वासन पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी अण्णासाहेब गहिरे, दुष्काळ निवारण कक्षाचे संदीप कासार, महादेव धायतडक यांनी दिले. त्यानंतर आंदोलन ग्रामस्थांनी मागे घेतले.
हेही वाचा

पाणी मागणी अर्ज ऑनलाईन स्वीकारावेत; विवेक कोल्हे यांची मागणी
पणजी : मिरामार किनार्‍यावर अंगावर वीज कोसळून केरळच्या पर्यटकाचा मृत्यू; पत्नी जखमी
काचेवर हातोडीने तडे देऊन बनवली पोर्ट्रेट्स्!