Election Commission : स्वतःच्या नियमांचे उल्लंघन करतोय दिल्ली निवडणूक आयोग
नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यात कमी मतदान झाल्यामुळे राजकीय पक्षच नव्हे तर निवडणूक आयोगही चिंतेत आहे. उर्वरित तीन टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
निवडणूक आयोगाच्या या सूचनेपूर्वीच दिल्ली निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी लहान मुलांचा वापर सुरू केला आहे. तर निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी करताना निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये, अशा कडक सूचना दिल्या होत्या. निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन मानले जाईल. निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करणाऱ्या राजकीय पक्ष आणि उमेदवारांवर कारवाई करण्यात येणार आहे. असे निर्दश निवडणूक आयोगाने दिले होते.
दिल्ली निवडणूक आयोग शाळकरी मुलांच्या मदतीने मतांची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आयोगाने यासाठी ठराव पत्र तयार केले आहे. हे ठराव पत्र शाळेतील मुलांना देऊन त्या ठराव पत्रावर मुलांना त्यांच्या पालकांची स्वाक्षरी घ्यायला सांगितली जात आहे. अशाप्रकारे निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न दिल्ली निवडणूक आय़ोग करत आहे.
प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाचे हे पाऊल कौतुकास्पद म्हणता येईल. मुलांना देशाचे भविष्य मानले जाते. अशा स्थितीत आतापासूनच मुलांच्या मनात निवडणुकीविषयी जागृती निर्माण करणे हे एक चांगले पाऊल आहे. मात्र निवडणूक आयोग या कृतीतून स्वतःच्याच नियमांचे उल्लंघन करत आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करुन आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन करत आहे.
निवडणूक आयोगाने याविषयी ५ फेब्रुवारी २०२४ रोजी यासाठी कठोर सूचना जारी केली होती. मुलांना निवडणूक प्रक्रियेत सामावून घेऊ नये, असे यावेळी सांगण्यात आले होते. तर स्वतः निवडणूक आयोग आता हे काम करत आहे. या प्रक्रियेद्वारे २५ मे रोजी दिल्लीत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या ५० लाखांनी वाढवता येईल, असा विश्वास दिल्ली निवडणूक आयोगाला आहे.