जिल्ह्यात अन्नप्रक्रिया योजनेत 85 कोटींची भांडवली गुंतवणूक
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेंतर्गत (पीएमएफएमई) आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 442 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यातून सुमारे 85 कोटी 64 लाख रुपयांची भांडवली गुंतवणूक झाली असून, संबंधितांनी 60 कोटी 34 लाख रुपयांचे कर्ज रक्कम बँकांनी मंजूर केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून मिळाली. दुग्धजन्य पदार्थ आणि गूळ उद्योगात सर्वाधिक गुंतवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्र सरकारच्या पीएमएफएमई प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभागाने तालुकास्तरापर्यंत प्रशिक्षणासह विशेष मोहीम राबविली. त्यास शेतकर्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीने व राज्य सरकारच्या भागीदारीने आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत केंद्राच्या अर्थसाहाय्याने पीएमएफएमई योजना सुरू करण्यात आली. पीएमएफएमई योजनेंतर्गत नवीन उद्योग स्थापन करणे, कार्यरत उद्योगाची स्तरवृध्दी करणे तसेच नूतनीकरणासाठी अशा उद्योगांना तांत्रिक व आर्थिक व्यवस्थापकीय अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.
सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना भांडवली गुंतवणुकीसाठी एकूण पात्र प्रकल्प किंमतीच्या कमाल 35 टक्के व 10 लाख रुपयांच्या मर्यादेत बँक कर्जाशी निगडित अर्थसाहाय्य देय आहे. पुणे जिल्ह्यातील 442 प्रकल्पांमध्ये सरासरी प्रतिप्रकल्प गुंतवणूक रक्कम 19.38 लाख रुपये असून सरासरी कर्ज मंजूर रक्कम 13.65 लाख रुपये आहे. ‘एक जिल्हा एक उत्पादनां’तर्गत टोमॅटो पिकाकरिता 2 कर्ज प्रकल्प मंजूर असून त्याची किंमत 22.88 लाख रुपये आहे. 2023-24 या वर्षात प्रत्यक्षात 2 हजार 210 लोकांना रोजगार मिळाला असून 419 लाभार्थ्यांना याकामी प्रशिक्षण देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
पीएमएफएमई अंतर्गत प्रकल्पाची वर्ष 2023-24 मधील स्थिती (रक्कम कोटीत)
क्र. प्रकार व प्रकल्प संख्या भांडवली कर्ज गुंतवणूक मंजूर
1. मसाले व त्या प्रकारातील अन्नपदार्थ -70 8.02 5.85
2. दुग्धजन्य पदार्थ – 66 16.10 11.05
3. बेकरी पदार्थ – 52 9.48 6.58
4. गूळ उद्योग – 43 12.95 8.78
5. प्राण्यांकरिता खाद्यपदार्थ – 32 6.93 4.93
6. पोषक घटकयुक्त पदार्थ – 8 2.65 0.95
7. भात आधारित पदार्थ – 21 4.54 3.3
8. तेलबियावर आधारित उद्योग-30 5.04 3.54
9. खाण्याची तयार उत्पादने – 28 5.23 3.76
10. गहू आधारित पदार्थ – 22 3.4 2.4
11. तृणधान्य आधारित खाद्यपदार्थ – 2 0.58 0.41
12. फळे आधारित खाद्यपदार्थ – 14 3.78 2.6
13. इतर उद्योग – 54 6.94 6.19
एकूण 442 प्रकल्प 85.64 60.34
हेही वाचा
Eknath Shinde | आमचे सरकार पॉझिटिव्ह अन् प्रॅक्टिकल
WPI Inflation | घाऊक महागाई दर एप्रिलमध्ये १३ महिन्यांच्या उच्चांकावर
गारपीट, वार्याचा मतदानाला फटका; आणे-माळशे मतदारांची पांगापांग