टीम इंडियाचे टी-20 वर्ल्डकपसाठी दोन बॅचमध्ये उड्डाण
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : T20 World Cup : टीम इंडिया पुढील महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी दोन बॅचमध्ये रवाना होणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याला दुजोरा दिला आहे.
आयपीएल स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 26 मे रोजी खेळला जाणार आहे. याच कारणामुळे टीम इंडियाला दोन बॅचमध्ये अमेरिका गाठावी लागणार आहे. संघाची पहिली बॅच 24 मे रोजी रवाना होईल, तर दुसरी बॅच आयपीएल फायनलनंतर म्हणजेच 26 मे रोजी रवाना होईल. भारतीय संघ 5 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. (T20 World Cup)
जय शाह यांनी सांगितले की, 24 मे रोजी पहिल्या बॅचमध्ये ज्या खेळाडूंचे संघ आयपीएल प्लेऑफसाठी पात्र ठरू शकणार नाहीत ते अमेरिकेला रवाना होतील. यात कोचिंग स्टाफचा देखील समावेश असेल. याचा अर्थ रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव यांच्यासह अनेक खेळाडू पहिल्या बॅचमधून जातील. कारण त्यांचा मुंबई इंडियन्स संघ लीगमधून बाहेर आहे. उर्वरित खेळाडू 26 मे रोजी आयपीएल फायनलनंतर रवाना होतील.
खेळाडूंच्या विश्रांतीवर जय शहा काय म्हणाले?
ज्या संघांना प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता नाही अशा खेळाडूंना साखळी टप्प्यातील उर्वरित सामन्यांसाठी जय शाह यांनी विश्रांती देण्यास नकार दिला. त्याचे म्हणणे आहे की, आयपीएल ही त्याच्यासाठी टी-20चे कौशल्य वाढवण्याची उत्तम संधी आहे. एलएसजी विरुद्ध एसआरएचच्या ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने किती छान खेळ केला. ते विसरून चालणार नाही. त्यामुळे जसप्रीत बुमराहला पुढील सामन्यात हेडला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली तर सरावासाठी यापेक्षा चांगली संधी कोणती असेल? असेही व्यक्त केले.
जैस्वाल-सॅमसन दुसऱ्या बॅचमध्ये (T20 World Cup)
विराट कोहली, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, ऋषभ पंत, अक्षर पटेल यांचाही पहिल्या तुकडीत समावेश होण्याची अपेक्षा आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांनाही आयपीएलमधून बाहेर पडण्याचा धोका आहे. दुसऱ्या बॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल, चेन्नई सुपर किंग्जचे शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा जाऊ शकतात, ज्यांचे संघ प्लेऑफच्या अगदी जवळ पोहचले आहेत.
टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज