रत्नागिरी: चित्रकला स्पर्धेचे कारण सांगून पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू
रत्नागिरी: Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील शीळ धरणात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि. २२) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. स्मित वासुदेव आंबेकर (वय ७), तनिष्क अक्षय आंबेकर (वय ८, दोघे रा. फणसवळे कोंड, रत्नागिरी) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. स्मित अंगणवाडीत शिकत होता. तर तनिष्क हा पहिलीत शिकत होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी १.४५ च्या सुमारास स्मित आणि तनिष्क आपआपल्या घरी शाळेत चित्रकलेच्या स्पर्धेसाठी जात असल्याचे सांगून बाहेर पडले होते. त्यानंतर ते शाळेत न जाता थेट धरण परिसरात गेले. त्यावेळी तेथील ग्रामस्थांनी त्यांना पाहून हटकले. परंतू त्यांची नजर चुकवून ते पुन्हा धरणाच्या दिशेने गेले. त्याचेळी धरणाच्या भिंतीच्या वरील बाजुला फणसवळे कोंड गावचे सरपंच निलेश लोंढे आणि दिलीप आंबेकर फिरण्यासाठी गेलेले असताना त्यांना हे दोघेही धरणाच्या दिशेने जाताना दिसले. त्यांनीही या दोघांना आवाज देत त्याठिकाणी जाऊ नका, असे सांगितले.
परंतु, या दोन्ही मुलांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत धरणात उड्या मारल्या. त्यांना उड्या मारताना पाहून सरपंच निलेश लोंढे आणि दिलीप आंबेकर यांनी धरणाच्या दिशेने धाव घेतली. परंतु हे अंतर जास्त असल्याने धरणाच्या ठिकाणी जाई पर्यंत दोन्ही मुले पाण्यात बुडाली होती. निलेश लोंढे आणि दिलीप आंबेकर यांनी पाण्यात उड्या मारत दोघांचीही शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा दिलीप आंबेकर यांना स्मित तेथील चिखल मिश्रीत पाण्यात सापडला. त्यांनी त्याला बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. त्यानंतर अर्ध्या तासानंतर तनिष्कचा मृतदेह निलेश लोढेंना मिळून आल्यावर त्यालाही जिल्हा शासकिय रुग्णालयात नेण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले.
स्मित आणि तनिष्कचे आई-वडील शेती काम करुन आपला उदरनिर्वाह चालवतात. ही घटना घडली तेव्हा स्मितचे आई वडील शेतात तर तनिष्कचे आई वडील घरीच होते. ग्रामस्थांनी त्यांना घडलेली हकिकत सांगितल्यावर त्यांनी टाहो फोडत जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. दरम्यान, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी आपल्या टीमसह जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. दोन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी करुन सायंकाळी उशिरा मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
दोन्ही मुलांच्या शाळेच्या बॅगमध्ये कपडे मिळून आल्याने ते घरातून पोहण्याच्या उद्देशानेच बाहेर पडल्याचे लक्षात येते. ही दोन्ही मुले ज्याठिकाणी बुडाली. ती जागा धोकादायक असल्याचे तेथील ग्रामस्थांचे मत आहे. त्याठिकाणी रत्नागिरी शहरातून अनेक जण फिरण्यासाठी येत असतात. परंतु तेथील ग्रामस्थ त्यांना त्याठिकाणी जाण्यापासून रोखून परत पठवत असतात. रविवारी सायंकाळी काही तरुण त्याठिकाणी पोहण्यासाठी आले असताना फणसवळे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष संतोष आंबेकर यांनी त्यांना परत पाठवले होते.
हेही वाचा
नारायण राणे कुटुंबीयांकडे 137 कोटींची मालमत्ता; रत्नागिरी-सिंधुदुर्गातील सर्वांत श्रीमंत उमेदवार
रत्नागिरी : लांजातून जाणाऱ्या काजळी नदीच्या पात्रात दोघे भाऊ बुडाले
रत्नागिरी: चिपळूण येथे विनयभंगप्रकरणी बीडीओंसहित तिघांवर गुन्हा दाखल