संचालकांना मोकळीक; सामान्य अडत्यांवर कारवाई : युवराज काची यांचा प्रशासनावर आरोप
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील अडते असोसिएशनचे अध्यक्ष आणि समितीचे संचालक अनिरुद्ध (बापू) भोसले यांना शेतमाल उतरविण्यासाठी प्रशासनाने विशेष सवलत देत दहा गुंठे जागा व्यवसायासाठी दिली आहे. तर, दुसरीकडे शेतमाल 15 फुटांच्या बाहेर आल्यास प्रशासन दंडात्मक कारवाई करत आहे. प्रशासनाची सामान्य अडत्यांबाबतची ही भूमिका अन्याय करणारी असल्याचा आरोप अडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची यांनी रविवारी बाजार समिती प्रशासनावर केला आहे.
बाजार आवाराच्या मुख्य प्रवेशद्वार क्रमांक 1 जवळील बाजूला ‘थेट शेतकरी ग्राहक’ विक्रीसाठी अंदाजे दहा ते पंधरा गुंठे जागा राखून ठेवण्यात आलेली आहे. मात्र, या ठिकाणी सध्या विद्यमान संचालकांच्या गाळ्यावर आलेल्या आंब्याच्या पेट्या खाली करण्यात आल्या आहेत. अडते असोसिएशनच्या अध्यक्षांना शेतमाल विक्रीसाठी ही जागा उपलब्ध करून दिल्याने प्रशासनाने संचालकांना एक न्याय व अन्य अडतदारांना एक न्याय, अशी भूमिका घेतल्याने बाजारातील अन्य अडतदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मार्केट यार्डात काही अडत्यांकडे शेतमाल जास्त येतो. त्यामुळे अनेकदा जागेअभावी तो शेतमाल पंधरा फुटांच्या पुढे जातो. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा दावा करत बाजार समिती 18 टक्के जीएसटीसह 5 हजार 900 रुपयांची दंडात्मक कारवाई करत आहे. एका बाजूला बाजार समिती शेतकर्यांसाठी आहे असं म्हणायचं आणि दुसर्या बाजूला त्यांच्याच शेतमालाचे नुकसान केले असल्याचादेखील आरोप काची यांनी केला.
बाजारात नवीन नवीन टपर्या पडत आहेत. जागोजागी अतिक्रमण वाढले आहे. मात्र, प्रशासनाला शेतमाल पंधरा फुटांच्या पुढे गेला की, वाहतूक कोंडी होत असल्याची प्रचिती येत आहे. बाजार समितीकडून काही पदाधिकार्यांना विशेष सवलत दिली जाते. तर सामान्य अडत्यांवर वाहतूक कोंडीच्या नावाखाली दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये, सामान्य अडते मात्र भरडले जात आहेत.
– युवराज काची, माजी उपाध्यक्ष, अडते असोसिएशन
हेही वाचा
बदल्यांनंतर प्रशासन आळसावले..! सामान्यांच्या तक्रारींकडे अधिकारी, कर्मचारी ढुंकूनही बघेनात
Lokshabha Elections 2024 : अमित शहांची संपत्ती ५ वर्षांत ३५ कोटींनी वाढली
कोल्हापूर : कळंबा जेलमध्ये पुन्हा मोबाईल; कैद्यावर गुन्हा