20व्या षटकात धावांचा पाऊस पाडण्यात धोनी अव्वल! जाणून घ्या आकडेवारी
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : MS Dhoni Record : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये महेंद्रसिंग धोनी फलंदाजीसाठी आला नाही. खरंतर धोनीला फलंदाजीला येण्याची गरज नव्हती, पण रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात धोनी फलंदाजीला आला आणि अखेरच्या षटाकांत खूप धावा वसूल केल्या. धोनीने अवघ्या 16 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 37 धावा फटकावल्या.
सीएसकेच्या ‘थलायवा’साठी वय केवळ आकडेवारी..! धोनीचा ४२ व्या वर्षी नवा विक्रम
मुकेश कुमारने 19व्या षटकात फक्त पाच धावा दिल्या आणि त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जच्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना जिंकण्याच्या आशा 19व्या षटकातच संपुष्टात आल्या, कारण शेवटच्या षटकात CSK ला विजयासाठी 41 धावांची गरज होती.
एनरिच नोरखियाने दिल्ली कॅपिटल्ससाठी शेवटचे षटक टाकले. धोनीने त्याची येथेच्छ धुलाई करून एकूण 20 धावा वसूल केल्या. 20 व्या षटकात 20 किंवा त्याहून अधिक धावा काढण्याच्या बाबतीत धोनी आधीच अव्वल फलंदाज आहे, परंतु आता या विक्रमातही त्याने आपली आघाडी मजबूत केली आहे. (MS Dhoni Record)
आतापर्यंत, एमएस धोनीने 20 व्या षटकात एकूण सहा वेळा 20 किंवा त्याहून अधिक धावा कुटल्या आहेत. रोहित शर्मा, मार्कस स्टॉइनिस आणि एबी डिव्हिलियर्स या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत, तिघांनीही प्रत्येकी तीन वेळा अशी कामगिरी केली आहे. तर युवराज सिंग, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, हार्दिक पंड्या आणि किरॉन पोलार्ड यांना प्रत्येकी दोनदा असे करण्यात यश आले आहे.
सीएसकेचा 20 धावांनी पराभव
आयपीएलच्या 13व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 20 धावांनी विजय मिळवत चेन्नईची विजयी घोडदौड थांबवली. या सामन्यात डेव्हिड वॉर्नर (52) आणि ऋषभ पंत (51) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीने 20 षटकात 5 गडी गमावून 191 धावा केल्या. पृथ्वी शॉने 43 धावांची जलद खेळी केली. प्रत्युत्तरात चेन्नईला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 171 धावा करता आल्या. सीएसकेला जरी पराभव स्वीकारावा लागला असला तरी या सामन्यातील धोनीची फलंदाजी पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. (MS Dhoni Record)
Latest Marathi News 20व्या षटकात धावांचा पाऊस पाडण्यात धोनी अव्वल! जाणून घ्या आकडेवारी Brought to You By : Bharat Live News Media.