पंकजा मुंडे यांना ज्योती मेटे आव्हान देणार का?

बीड लोकसभा मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर करून ज्योती विनायकराव मेटे यांनी चुरस वाढविली आहे. भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर करताच ज्योती मेटे सक्रिय झाल्या आहेत. शरद पवार यांच्याकडून शब्द घेऊन त्या लोकसभेच्या रणांगणात उतरल्या आहेत. त्यांना ‘तुतारी’ मिळाली, तर या मतदार संघात चुरस वाढणार आहे. (Lok Sabha Election 2024) शिवसंग्राम पक्षाची … The post पंकजा मुंडे यांना ज्योती मेटे आव्हान देणार का? appeared first on पुढारी.

पंकजा मुंडे यांना ज्योती मेटे आव्हान देणार का?

बीड : धनंजय लांबे

बीड लोकसभा मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर करून ज्योती विनायकराव मेटे यांनी चुरस वाढविली आहे. भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर करताच ज्योती मेटे सक्रिय झाल्या आहेत. शरद पवार यांच्याकडून शब्द घेऊन त्या लोकसभेच्या रणांगणात उतरल्या आहेत. त्यांना ‘तुतारी’ मिळाली, तर या मतदार संघात चुरस वाढणार आहे. (Lok Sabha Election 2024)
शिवसंग्राम पक्षाची स्थापना करून आपले वेगळे राजकीय अस्तित्व निर्माण करणारे दिवंगत नेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी थेट लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी कंबर कसली आहे. विनायकराव मेटे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जात होते. परंतु, भाजपमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे ज्योती मेटे यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. बीड मतदार संघातून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर होताच, ज्योती मेटे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. बीडमध्ये तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी पवार चाचपणी करीतच होते. वंजारी विरुद्ध मराठा अशी लढत व्हावी, अशी रणनीती आखली गेली नसती, तरच नवल होते. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये असे प्रयत्न करण्यात आले, परंतु दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्यापुढे कोणाचीही डाळ शिजली नाही. त्यांच्या निधनानंतर पंकजा यांनी या होम पिचवर कारकीर्द सुरू केली. बहीण डॉ. प्रीतम यांना दोन वेळा लोकसभेत पाठवले. (Lok Sabha Election 2024)
दरम्यानच्या काळात घडलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे त्यांना परळी हा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ धनंजय मुंडे यांच्यासाठी सोडावा लागला आणि राजकीय भवितव्याचाच प्रश्न उभा राहिला. त्यांनी अप्रत्यक्षपणे वेळोवेळी नाराजी व्यक्त केली. अखेर डॉ. प्रीतम मुंडे यांच्याऐवजी त्यांना लोकसभेची संधी देण्यात आली आहे.
ज्योती मेटे यांच्या आधी गतवेळचे पराभूत उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याच नावाची चर्चा मतदार संघात सुरू झाली होती. त्यामुळे पंकजा यांचा विजय सुकर मानला जात होता. आता त्यांच्या तुलनेत कमी अनुभव असलेल्या ज्योती मेटे मैदानात उतरल्या आहेत. मराठा मतांच्या बळावर निवडणूक जिंकण्याचे त्यांचे नियोजन आहे. मात्र, जे धाडस विनायकराव मेटे यांनी कधी दाखविले नाही, ते त्यांच्या पत्नी दाखवत आहेत, याबद्दल जिल्ह्यात चर्चा आहे. अर्थात, शरद पवार यांच्याकडून उमेदवारी मिळाली, तरच मेटे या निवडणुकीत प्रभाव दाखवू शकतील. तिकीट त्यांना मिळते की सोनवणे यांना, याबद्दल जिल्ह्यात उत्सुकता आहे. गेल्या काही महिन्यांपासून जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर हे तीनही जिल्हे मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी या निवडणुकीत प्रत्येक मतदार संघात एक अपक्ष मराठा उमेदवार उभा करून त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर ज्योती मेटे यांना ही निवडणूक लढवावी लागणार आहे. सकल मराठा समाजाचा स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला, तर ही चुरस आणखी वाढणार आहे. अर्थात, जरांगे यांचा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्नदेखील ज्योती मेटे यांच्याकडून केले जाण्याची शक्यता आहे.
महिला लोकप्रतिनिधींची परंपरा
बीड जिल्ह्यात दिवंगत नेत्या केशरकाकू क्षीरसागर यांच्यापासून महिला लोकप्रतिनिधींची मोठी परंपरा आहे. काँग्रेसच्या रजनी पाटील याच जिल्ह्याच्या. त्यानंतर ही परंपरा पंकजा, डॉ. प्रीतम मुंडे यांनी पुढे नेली. निवडणूक लढवण्यासाठी मेटे यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे आणि तो मंजूरही झाला आहे. त्यामुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा राज्याचे लक्ष वेधून घेणार, अशी चिन्हे आहेत. अर्थात, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अद्याप ज्योती मेटे यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. मात्र, या पक्षाच्या त्याच उमेदवार असतील, असे संकेत त्यांच्या तयारीवरून मिळत आहेत. (Lok Sabha Election 2024)
हेही वाचा :  

लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान
अभिनेता सनी देओलचे तिकीट भाजपने कापले
इंदिरा सरकारने कठोरपणे ‘कचाथीवू’ श्रीलंकेला दिले; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

Latest Marathi News पंकजा मुंडे यांना ज्योती मेटे आव्हान देणार का? Brought to You By : Bharat Live News Media.