हिंगोली : बेपत्ता मुलाचा तलावात सापडला मृतदेह
हिंगोली, Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील सरस्वतीनगर भागातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षीय मुलाचा मृतदेह आज (दि.१५) दुपारी सिरेहकशाह बाबा तलावामध्ये तब्बल २४ तासानंतर सापडला आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.
शहरातील सरस्वती नगरातील रहिवासी असलेला आदित्य सागर बक्षी (वय १५) हा मुलगा बुधवारी (दि.१३) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. सायंकाळी तो घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र तो सापडला नाही. त्यानंतर गुरुवारी(दि.१४) त्याचे वडील सागर बक्षी यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, १५ मार्च रोजी सकाळी उपविभागीय अधिकारी यांच्यासह पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, जमादार अशोक धामणे, विलास वडकुते, संभाजी लकुळे, धनंजय क्षिरसागर यांच्यासह पथकाने शहरातून बाहेर जाणारे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली. त्यानंतर दुपारी शहरालगत पाहणी करीत असताना सिरेहक शाह बाबा तलावाच्या बाजूला सायकल व तलावाच्या काठावर कपडे दिसले. नातेवाईकांनी सायकल व कपडे आदित्यचेच असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी तलावाच्या परिसरात शोध सुरु केला. त्यानंतर दुपारी त्याचा मृतदेह तलावातील पाण्यावर तरंगताना दिसून आला. तब्बल २४ तासानंतर हा मृतदेह आढळून आला त्यानंतर पोलिसांनी मृतदेह तलावाच्या बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात पाठविला. तो पोहण्यासाठी तलावात गेला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे हिंगोली शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
वाशिम : विजेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू
भंडारा: बोथली येथे नाल्यात बुडून मायलेकीचा मृत्यू
Jalgaon News : अमळनेरच्या झाडी येथे मध्यरात्री झोपडीला आग, १९ शेळ्यांचा होरपळून मृत्यू
Latest Marathi News हिंगोली : बेपत्ता मुलाचा तलावात सापडला मृतदेह Brought to You By : Bharat Live News Media.