दुष्काळाच्या झळा ! पाण्याअभावी शेती, भावाअभावी शेतकरी संकटात
कैलास शिंदे
नेवासा : निसर्गाच्या लहरीपणामुळे कधीही कोणताही ऋतू सुरू होत आहे. उन्हाळ्याला अजून महिनाभर अवधी असतानाच हिवाळ्यातच उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. यंदा तालुक्यात लवकरच पाणीप्रश्नाचा नागरिकांना सामना करावा लागणार आहे. फेब्रुवारीपासूनच दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. तालुक्यात जेमतेम पाणी पातळी असल्याने सध्या तरी टँकरची गरज नाही.
शेतकरी पिकवलेल्या शेतमालाला भाव नसल्याने आर्थिक संकटात सापडलेला आहे. कापूस, सोयाबीन मालाची वाट लागली आहे.
शेतातील बोअरवेल उन्हाळ्याअगोदरच गुळण्या मारत आहेत. तालुक्यात दमदार पाऊस न झाल्याने मार्चनंतर पाणी कमी होत असतानाच महिन्याअगोदरच पाणी संकट तालुक्यावर आल्याचे चित्र आहे. उशिरा पेरणी झालेल्या व थंडीचा मागमूसही दिसत नसल्याने गहू पिकांची स्थिती कशी होणार या चिंतेत बळिराजा सध्या दिसत आहे. पाण्याची पातळी वाढलेली नसल्याने व पावसाने दगा दिल्याने यंदा ऊस लागवडीचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. आहे त्या उसाची ऊसटोळ्यांअभावी वाट लागली आहे. तालुक्यातील बाहेरील साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस पळवला आहे.
विहीर व कूपनलिकांच्या पाण्याचा भरवसा नसल्याने कमी पाण्यात आणि कमी दिवसांत येणार्या पिकांकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. गहू पिकाला त्याचा फटका बसत आहे. खोडकिडा, तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. फवारणीला वेग आला आहे. चारा टंचाई निर्माण होणार आहे. गंगथडी भागातील बेलपिंपळगाव, जैनपूर, बेलपांढरी, सुरेगाव, भालगाव, वरखेड, गळनिंब, शिरसगाव, प्रवरासंगम या परिसरात जायकवाडीच्या फुगवट्यामुळे पाणी पातळी बरी आहे. या पट्ट्यात उशिरा उन्हाळा जाणवतो. धनगरवाडी, नारायणवाडी, झापवाडी, वांजळपोई, कारेगाव, मुकिंदपूर, म्हसले, गोंडेगाव, पिचडगांव, तेलकुडगाव, वडुले, चिलेखनवाडी, सोनई परिसरातील वाड्या-वस्त्यांमध्ये उन्हाळ्यातील झळा जाणवू लागल्या आहेत.
शेतकर्यांनी शेतातील ऊस गेल्यानंतर पाचट जाळू नये. या पाचटाचा जमिनीत खताकरिता उपयोग होईल. शेतात गारवा राहणार आहे. या उपक्रमाची सध्या जनजागृती करण्याचे काम कृषी विभागाकडून केले जात आहे.
– धनंजय हिरवे, तालुका कृषी अधिकारी, नेवासा.
उन्हाळ्याची चाहूल लागली असली, तरी पाणी टँकरची मागणी नाही. नेहमी धनगरवाडी-नारायणवाडी या भागात पाणीटंचाई जाणवत असते. त्यामुळे सध्या सार्वजनिक विहीर अधिग्रहण करण्याचे काम चालू आहे.
– संजय लखवाल, गटविकास अधिकारी, नेवासा
शेतीमालाला भाव नाही. कांद्याने वांदा केला. पावसाळ्यात दमदार पाऊस नसल्याने जमिनीतील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. यंदाचा उन्हाळा कडक असेल.
– विनायक जाधव, शेतकरी, गोंडेगाव
हेही वाचा
मराठा आरक्षण हा ऐतिहासिक निर्णय : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Jalgaon Crime : गांजा सेवन प्रकरणी तिघांवर कारवाई
जळगाव : प्लॉट खरेदीच्या नावाखाली फसवणूक
Latest Marathi News दुष्काळाच्या झळा ! पाण्याअभावी शेती, भावाअभावी शेतकरी संकटात Brought to You By : Bharat Live News Media.