चौशिंगे बघायला, चला राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात! हरणांची प्रजात दाखल

कात्रज : Bharat Live News Media वृत्तसेवा : येथील वन्यजीवांच्या अधिवासासाठी प्रसिद्ध असलेल्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात चार चौशिंगे (हरणांची एक प्रजात) दाखल झाले असून, त्यांना पर्यटकांच्या सार्वजनिक प्रदर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. छत्तीसगड वन विभागाकडून भेट स्वरूपात देण्यात आलेल्या चौशिंग्यांच्या दोन जोड्या बिलासपूर येथील कानन पेंढारी प्राणिसंग्रहालयातून आणण्यात आल्या आहेत.
या दोन जोड्यांसह संग्रहालयात आता चौशिंग्यांची संख्या आठ झाली आहे. नवीन बांधण्यात आलेल्या खंदकांत त्यांना सोडण्यात आले आहे. प्राणिसंग्रहालयातील वन्यजीवांचे वैविध्य व सुसज्ज नियोजन व नवीन प्राण्यांचे आगमन यामुळे पर्यटकांच्या आनंदात भर पडत आहे.
130 एकर विस्तीर्ण क्षेत्रात वसलेल्या प्राणिसंग्रहालयात 436 विविध जातींच्या वन्यजीवांचा अधिवास आहे. प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाकडून प्रशस्त खंदक बांधण्यात आले असून, वनसंपदेने नटवल्याने नैसर्गिक अधिवसात वन्यजीव राहतात.
तसेच डिसेंबर महिन्यात दोन तरस आणि एक बिबट्याही कर्नाटक वनविभागाकडून मिळाला आहे. हंपीच्या अटलबिहारी वाजपेयी प्राणिसंग्रहालयातील हे प्राणी असून कात्रज प्राणिसंग्रहालयाने केलेल्या मागणीनुसार भेट स्वरूपात मिळाले आहेत. या प्राण्यांचा विलगीकरणाचा काळ संपला असून ते स्थानिक वातावरणात स्थिरावले आहेत. यांच्या समावेशानंतर प्राणिसंग्रहालयात आता एकूण बिबट्यांची संख्या ही चार झाली आहे. यात तीन मादी व एका नराचा समावेश आहे. तर एकूण तरसांची संख्यादेखील तीन झाली आहे.
या प्राण्यांसह सिंह, वाघ, बिबटे, हरीण, चिंकारा, हत्ती, माकडे, वानर, गवा, अस्वल, लांडगा, कोल्हा, शेकरू, रानमांजर, वाघाटी आदी प्राणी व विविध जातींचे सरपटणारे प्राणी पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.
आणखी एक सिंहही लवकरच
आगामी काळात हरियाणा राज्यातील रोहतक प्राणिसंग्रहालयातून मादी सिंह आणण्यात येणार आहे. त्याची परवानगी घेण्याचे काम सुरू असून लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण करून मादी सिंह कात्रज प्राणिसंग्रहालयात दाखल होईल. त्याचबरोबर, पिसोरी हरणाच्या आणि लायन टेल्ड मकाकच्याही (एका प्रकारचे माकड) खंदकाचे काम सुरू आहे. पुढील सहा महिन्यांत पूर्ण होईल. त्यानंतर हे प्राणी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती प्राणिसंग्रहालय प्रशासनाने दिली.
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात येणार्या पर्यटकांसाठी जास्तीत जास्त प्राणी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा कायम प्रयत्न असतो. त्या अनुषंगाने भविष्यात प्रदर्शनासाठी आणखी वन्यप्राणी आणण्याचा आमचा मानस असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
– राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, कात्रज
हेही वाचा
स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अशोक जैन यांना जाहिर
उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईच्या झळा; नांदेड, धायरी परिसरातील चित्र
नवले पुलाजवळ डंपरची प्रवासी बसला धडक; सात जण जखमी
Latest Marathi News चौशिंगे बघायला, चला राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात! हरणांची प्रजात दाखल Brought to You By : Bharat Live News Media.
